सोशल मीडियावर रोज अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी मनाला स्पर्श करणारे भावूक क्षण, कधी धाडस दाखवणाऱ्या घटना, तर कधी अगदी साध्या; पण मनात घर करणाऱ्या गोष्टी लोकांना खूप आवडतात. त्यामध्ये लहान मुलांचे निरागस वागणे पाहायला लोक खास उत्सुक असतात. त्यांच्या चेहऱ्यावर येणारे भाव, त्यांच्या सहज आणि प्रामाणिक प्रतिक्रिया पाहून कधी आपोआप हसू येते, तर कधी त्यांची थोडी काळजीही वाटते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि तो सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

हा व्हिडीओ पाहून अनेक लोकांना गंमत वाटत आहे; तर काही जण गंभीरपणे विचार करत आहेत की, लहान मुलांसाठी आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये काळजी घेणे किती आवश्यक असते. सुरुवातीला हा व्हिडीओ अगदी आनंदी आणि उत्साहाने भरलेला वाटतो; पण पुढे घडणारी छोटीशी घटना प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. त्यामुळेच हा व्हिडीओ केवळ मनोरंजनापुरता न राहता, चर्चा आणि मत व्यक्त करण्याचा विषय ठरत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ सोलापूरमधील एका किंडर गार्डन शाळेतील कार्यक्रमाचा आहे. कार्यक्रमात पारंपरिक मराठी पोशाख परिधान केलेल्या दोन चिमुकल्या मुली लावणी नृत्य सादर करण्यासाठी स्टेजवर येतात. गाणे सुरू होताच स्टेजवर स्मॉग मशीनमधून धूर सोडला जातो. मात्र, हा धूर पाहून मुली घाबरतात. एक मुलगी धूर दिसताच घाबरून स्टेजवरून पळूनच जाते; तर दुसरी मुलगी तिथेच थांबून घाबरून रडू लागते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे स्टेजवर गोंधळ होतो.

घाबरलेल्या मुलीला पाहून तिचे पालक किंवा शिक्षक तत्काळ स्टेजजवळ येतात आणि तिला समजावण्याचा प्रयत्न करतात. पण, ती मुलगी इतकी घाबरली होती की, ती शांत होत नाही. बॅकग्राऊंडला गाणे सुरूच राहते; पण दोन्ही मुली स्टेजवरून खाली उतरतात आणि त्यांचा डान्स परफॉर्मन्स अर्धवटच थांबतो. हा संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आणि काही वेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

पाहा व्हिडीओ

या व्हिडीओवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक युजर्सना मुलींच्या भीतीमध्येही दिसलेला निरागसपणा पाहून हसू आले असून, त्यांनी “किती गोड मासूमपणा आहे” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी “धुरामुळे सगळा कार्यक्रम बिघडला”, असे म्हटले आहे. पण यासोबतच अनेक संतप्त प्रतिक्रियादेखील पाहायला मिळत आहेत. काही युजर्सनी शाळा प्रशासनाला सल्ला दिला आहे की, अशा कार्यक्रमांमध्ये वापरण्यात येणाऱ्या गोष्टींबाबत मुलांना आधीच कल्पना द्यावी.

रिहर्सलमध्ये स्मॉग, लाईट्स किंवा मोठा आवाज यांचा वापर करून मुलांना सवय लावावी, जेणेकरून प्रत्यक्ष कार्यक्रमात त्यांना भीती वाटणार नाही. एका युजरने तर “पहिली मुलगी घाबरल्यामुळे दुसरीही घाबरली” असे म्हटले आहे. हा व्हिडीओ मुलांच्या निरागसतेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला आहे. कार्यक्रम आयोजन करताना लहान मुलांच्या मानसिकतेचा विचार करणे किती आवश्यक आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे.