Railway station viral video: अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला असून त्यात रेल्वेतील टीटी एका प्रवाशाला जबरदस्तीने ओढत नेताना दिसत आहे. या घटनेमुळे प्रवासी हक्क, रेल्वे कर्मचारी कोणत्या मर्यादेत कारवाई करू शकतात आणि अशा प्रसंगात नियमांची अंमलबजावणी कशी करावी यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

व्हिडीओत दिसणाऱ्या टीटीच्या कठोर वागण्यामुळे अनेकांनी टीटीवर टीका केली, तर काहींनी टीटीचं समर्थन करत प्रवासीही नियम पाळत नाहीत, अशी भूमिका घेतली. या घटनेने रेल्वे कर्मचारी आणि प्रवासी दोघांमधील तणावाचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. हा व्हिडीओ एका रेल्वे स्थानकावर घडलेल्या घटनेचा आहे, जिथे एक पुरुष टीटी एका तिकीट नसलेल्या प्रवाशाशी वाद घालताना दिसतो आहे.

व्हिडीओ इन्स्टाग्रामवर lafdavlog या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून त्यात स्पष्ट लिहिलं आहे की, “योग्य तिकीट नसणे हा गुन्हा नसून नियमभंग आहे, पण म्हणून कोणालाही मारहाण किंवा अपमान करण्याचा अधिकार नाही.” या कॅप्शनमुळेच व्हिडीओ अधिक चर्चेत आला.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक पुरुष टीटी त्या प्रवाशाची कॉलर पकडून त्याला जोरात ओढत नेताना दिसतो. प्रवासी वारंवार स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण टीटीई त्याला ढकलत, ओढत प्लॅटफॉर्मच्या दिशेने घेऊन जातो. त्या वेळी त्याच्यासोबत असलेली महिला टीटी प्रवाशाच्या बॅगेवर पकड ठेवून आहे आणि परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करताना दिसते.

पाहा व्हिडिओ

पुरुष टीटी प्रवाशाला काहीतरी धमकावत असल्याचेही जाणवते. संपूर्ण प्रसंग स्थानकावरच्या गर्दीत घडत असल्याने आजूबाजूला गोंधळाचे वातावरणही दिसते. हा व्हिडीओ पाहून अनेकांना तो धक्कादायक वाटला. हा व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर प्रतिक्रियांमध्ये दोन स्पष्ट गट तयार झाले. पहिला गट टीटीवर टीका करणारा आहे. अनेकांचे म्हणणे होते की, तिकीट नसले तरी प्रवाशाशी हाताळणी करताना मानवीय वागणूक देणे आवश्यक आहे. काहींनी तर टीटीला निलंबित करण्याची मागणी केली. “ही मारहाण चुकीची आहे, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे” असे अनेकजण म्हणाले.

दुसरा गट टीटीचं समर्थन करणारा आहे काहींनी लिहिलं की, अनेक प्रवासी मुद्दाम पळून जातात, भांडतात, दंड भरण्यास नकार देतात. “नियम न पाळणाऱ्या प्रवाशांमुळेच टीटीला कठोर व्हावं लागतं” किंवा “देशात कायदा पाळण्यासाठी कधी कधी कडकपणा आवश्यक असतो” अशा प्रतिक्रिया आल्या.