Viral Video: २४ वर्षांच्या एका उद्योजकाने नोकरी सोडल्यानंतर अवघ्या ४ महिन्यांत ₹१ कोटींचा स्टार्टअप उभारल्याचा दावा करत सोशल मीडियावर लक्ष वेधलं आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये ‘LinkPlease’ नावाच्या ऑटोमेशन प्लॅटफॉर्मचा सह-संस्थापक उज्ज्वल याने बाजारातील कमतरता कशी ओळखली आणि आपले प्रोडक्ट जलद गतीने कसे वाढवले, हे सांगितले.
व्हायरल व्हिडीओ (₹1 crore startup in 4 months Viral Video)
उज्ज्वल म्हणाला “मी २४ वर्षांचा आहे आणि मी फक्त ४ महिन्यांत १ कोटींचा व्यवसाय उभारला. ४ महिन्यांपूर्वी मी LinkPlease तयार करण्यासाठी नोकरी सोडली आणि आज १०,००० हून अधिक क्रिएटर्स याचा वापर करत आहेत,” असे त्याने सांगितले.
आपला प्रवास समजावून सांगताना उज्ज्वलने तो ३ टप्प्यांत मांडला – गॅप शोधणे, सोल्यूशन तयार करणे आणि प्रोडक्ट स्केल करणे. त्याने सांगितले की ही कल्पना कंटेंट क्रिएटर्सना येणाऱ्या एका वारंवार होणाऱ्या समस्येतून आली. “क्रिएटर्स चांगला कंटेंट पोस्ट करत होते, पण डीएम्स हाताळता येत नसल्यामुळे त्यांची वाढ थांबत होती,” असं तो म्हणाला आणि याला “मोठी मार्केट गॅप” असं संबोधलं.
त्याने पुढे सांगितलं की टीमने कमी खर्चातील ऑटोमेशन इंजिन तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आणि सुरुवातीला यूजर फीडबॅक मिळवण्यासाठी फ्री व्हर्जन लॉन्च केलं. “आम्ही पूर्ण लक्ष केंद्रित केलं आणि आमचं उद्दिष्ट सोपं होतं – कमी खर्चात सर्वात कार्यक्षम ऑटोमेशन इंजिन तयार करणं. आम्ही V1 लॉन्च केलं, ते सर्व क्रिएटर्ससाठी मोफत केलं आणि खऱ्या फीडबॅकच्या आधारे सुधारणा केल्या,” असं तो म्हणाला. त्यानुसार अनेक क्रिएटर्सनी सुरुवातीलाच प्लॅटफॉर्म स्वीकारायला सुरुवात केली.
वाढत्या वापरासह, उज्ज्वल म्हणाला की टीमने खऱ्या यूजर डेटाचा वापर करून प्रोडक्ट अधिक सुधारलं. “आज १०,००० हून अधिक क्रिएटर्स LinkPlease सोबत ऑटो-पायलटवर वाढत आहेत,” असा त्याचा दावा आहे. “आम्ही इथेच थांबणार नाही. आम्ही LinkPlease जगातील सर्वोत्तम ऑटोमेशन प्लॅटफॉर्म बनवत आहोत. आणि पुढचा टप्पा स्पष्ट आहे – १ कोटींपासून १० कोटींपर्यंत,” असं तो म्हणाला.
पोस्टच्या कॅप्शनमध्ये उज्ज्वलने संसाधनांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची असल्यावर भर दिला. “फंडिंग नाही, टीम नाही, फक्त जोरदार अंमलबजावणी – अशा पद्धतीने ४ महिन्यांत १ कोटींचा स्टार्टअप उभारला. क्रिएटर्सना खरी समस्या होती, आम्ही ती पटकन सोडवली आणि मार्केटने प्रतिसाद दिला. ही फक्त सुरुवात आहे,” असे त्याने सांगितले.
सोशल मीडियावरील प्रतिक्रिया
या पोस्टला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. अनेकांनी त्याच्या मेहनतीचे कौतुक केले आणि पुढे जाण्यास प्रोत्साहन दिले, तर काहींनी वाढीसाठी सूचना दिल्या.
एका यूजरने लिहिलं, “तुम्ही केलेल्या मेहनतीचं आणि तयार केलेल्या गोष्टीचं मला खरोखर कौतुक आहे, पण तुम्ही ऑर्गॅनिक ट्रॅफिक आणि यूजर्स वाढवण्यासाठी SEO वर काम करायला हवं. पेड इन्फ्लुएंसर कोलॅबरेशनचा विचार करू शकता. X आणि LinkedIn ऑटोमेशन जोडल्यास मोठी मार्केट गॅप भरली जाईल.”
दुसऱ्या यूजरने कमेंट केली, “उद्योजकता सोपी नाही, पण तुम्ही छान काम करत आहात, पुढे चालू ठेवा!!”
तिसऱ्या यूजरने लिहिलं, “अंमलबजावणी सर्वात महत्त्वाची असते. खऱ्या समस्येचं जलद समाधान नेहमी लक्ष वेधते. १० कोटींच्या टप्प्याची उत्सुकता आहे!”
