आपला देश आणि देशातील बांधवांचं रक्षण करण्यासाठी आपले सैनिक नेहमीच सीमेवर तैनात असतात. हवामान कसंही असो, परिस्थिती कशीही असो, आपले सैनिक डोळ्यात तेल घालून सीमेवरील नापाक कुरघोडींना तोडील तोड उत्तर देत असतात. आपल्या देशातील जवान देशाचा गौरव पण आहे आणि अभिमान ही. त्यामुळेच आपले जवान आपल्या समोर दिसताच आपला हात आपोआप त्यांना सलाम ठोकण्यासाठी पुढे सरसावतात. ते मग वयस्क आजोबा असोत किंवा मग बच्चे कंपनी….असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. यात नुकतंच चालायला शिकलेला लहान मुलगा सैनिकांना पाहून सलाम करताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच भावूक व्हाल.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, एक मुलगा विमानतळाबाहेर त्याच्या वडिलांसोबत फिरत आहे. या दरम्यान, त्याच्या बाजुने सीआयएसएफ टीमची गाडी जात असते. सीआयएसएफ टीमची गाडी पाहून या लहानग्या मुलाची इवलेसे पावलं गाडीच्या बाजुला थांबतात. गाडीमधल्या सीआयएसएफ जवानांना पाहून हा चिमुकला मुलगा त्यांना सलाम ठोकताना दिसून येतोय. या चिमुकल्याचे हात त्याच्या कपाळावर ठेवता येत नव्हते तरीही या चिमुकला सैनिकाला सलाम ठोकत होता. आता आता चालायला शिकलेला हा लहान मुलगा आपल्याला सलाम ठोकतोय हे पाहून मग गाडीमधल्या जवानाने सुद्धा या चिमुकल्या मुलाला सलाम करताना दिसून येत आहे. काही वेळ सैनिक आणि हा चिमुकला दोघेही एकमेकांना सलाम करत थांबले होते. त्यानंतर हा लहान मुलगा आपल्या वडीलांसोबत आत निघून जातो. पण गाडीमधल्या सैनिकाची नजर या चिमुकल्याकडेच होती.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक भारतवासीयांची देशभक्ती उफाळून येणं हे सहाजिकच आहे. आपल्या देशातील लहना मुलांमध्ये सुद्धा रूजलेली देशभक्ती पाहून नेटिझन्स भावूक होताना दिसून येत आहेत. या व्हिडीओमध्ये बॅकग्राउंडला ‘तेरी मिट्टी में मिल जांवा’ वाजत असलेल्या या गाण्यावर हा व्हिडीओ तर आणखीनच मनाला भावतो.

हा व्हिडीओ बंगळूर विमानतळावरचा असल्याचं सांगण्यात येतंय. २४ ऑक्टोंबर रोजी हा व्हिडीओ अभिषेक कुमार झा नावाच्या युजरने त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला होता. त्यानंतर या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला. केवळ एका दिवसात या व्हिडीओला ७४ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १९५३ जणांनी हा व्हिडीओ रीट्विट करत आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी तर या चिमुकल्याला घडवणाऱ्या मात-पित्यांचं कौतूक केलंय.

काही युजर्सनी लिहिलं, “या लहान मुलाने मन जिंकलं….’ त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिले, ‘हे फक्त माझ्या भारत देशामध्ये शक्य आहे, जय हिंद.’ दुसऱ्याने लिहिले, भावनिक क्षण, आमच्या शूर जवानांना सलाम.’ आणखी दुसर्‍या युजरने लिहिले, “हे दृश्य पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात अश्रू आले.”