Grandmother gym workout viral video: वय वाढलं की शरीर थकतं, हालचाल कमी होते आणि “आता आपल्याकडून काही शक्य नाही”, असा समज अनेकांच्या मनात घर करून बसतो. पण काही व्यक्ती अशा असतात, ज्या अशा नकारात्मक विचाराला खोटं ठरवतात. स्वत:ची जिद्द, इच्छाशक्ती व मेहनत यांच्या जोरावर त्या सिद्ध करतात की, वय हा केवळ आकडा आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे तरुणही फिटनेसकडे दुर्लक्ष करताना दिसतात, तिथे एका आजीनं जिममध्ये घाम गाळत सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.

त्यांच्या या प्रवासानं अनेकांना नवी प्रेरणा मिळत असून, या वयातही आजी जिमला जाऊन डेडलिफ्ट करतात हे पाहून हा व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे.दिल्लीतील ७० वर्षीय रोशनी देवी सांगवान यांची ही प्रेरणादायी गोष्ट आहे. २०२२ साली त्यांच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना आर्थरायटिस असल्याचं सांगितल. चालणं-फिरणं कठीण झालं, रोजच्या कामांसाठीही त्यांना आधार घ्यावा लागत होता. उपचार म्हणून फिजिओथेरपी सुरू झाली.

त्या काळात त्यांचा आत्मविश्वास ढासळला होता; पण त्यांच्या मुलानं त्यांना खचू दिलं नाही. फिजिओथेरपीनंतर त्यानं आईला जिममध्ये जाण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला रोशनी देवी घाबरल्या होत्या; पण हळूहळू त्यांनी सराव सुरू केला. साध्या व्यायामापासून सुरुवात करीत त्यांनी वजन उचलण्यापर्यंत मजल मारली. आज त्या तब्बल १०५ किलो वजन उचलतात. वयाच्या सत्तराव्या वर्षी जिममध्ये नियमित सराव करून त्या तरुणांनाही लाजवतात. आता त्यांची तब्येत सुधारलीय, वेदना कमी झाल्यात आणि आत्मविश्वास वाढलाय.

पाहा व्हिडीओ

रोशनी देवी यांचा हा प्रवास सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक जण त्यांच्या जिद्दीचं कौतुक करत आहेत. “या वयातही आजी जिममध्ये वजन उचलतात; मग आपण का नाही?” अशी प्रतिक्रिया तरुणांकडून व्यक्त होत आहे. महिलांसाठी त्या प्रेरणास्थान ठरत आहेत. वय, आजार किंवा परिस्थिती यांनी त्यांच्या इच्छाशक्तीसमोर मान झुकवली असल्याचं त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे.

डॉक्टर आणि फिटनेस तज्ज्ञही त्यांचं कौतुक करीत असून, योग्य मार्गदर्शनाखाली व्यायाम केल्यास वय ही अडचण ठरत नाही; असं मत ते व्यक्त करत आहेत. रोशनी देवी आज केवळ डेडलिफ्ट करत नाहीत, तर लोकांना प्रेरणाही देतात. त्यांची कथा सांगते की, स्वतःवर विश्वास ठेवला, तर कोणत्याही वयात फिट होता येतं. कारण- फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी वयाचा आकडा महत्वाचा नसतो…