Video : …अन् दूधसागर धबधब्याखालीच थांबली ट्रेन; गोव्यातील हा व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय

हा धबधबा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक मानला जातो, या धबधब्याची उंची ३१० मीटर तर रुंदी ३० मीटर इतकी असून पावसाळ्यात या ठिकाणाला अनेक पर्यटक भेट देतात

Dudhsagar Waterfall
रेल्वेनेच हा व्हिडीओ शेअर केलाय

गोव्यामध्ये निसर्गाचं एक अनोख रुप पहायला मिळालं. येथील दूधसागर धबधब्याजवळ ट्रेन अगदी धबधब्याच्या पाण्यात न्हाऊन निघाल्याचा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयानेच हा व्हिडीओ शेअर केला आहे. दर पावसाळ्यामध्ये दूधसागर धबधबा पाहण्यासाठी येथे पर्यटक आवर्जून येतात. मात्र त्याचवेळी गोवामार्गे दक्षिणेत जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांनाही दूधसागर धबधब्याचं सुंदर रुप आपल्या डोळ्यात साठवण्याची संधी रेल्वे प्रवासाच्या तिकीटासोबत मोफत मिळते. कर्नाटकमधील बेंगळुरु आणि गोव्याला जोडणाऱ्या मार्गावर असणाऱ्या या धबधब्याचं पाणी वाऱ्यामुळे समोरुन जाणाऱ्या रेल्वेवर अगदी फवारा मारल्याप्रमाणे उडतं. पावसाळ्यामध्ये जोरदार वारा असल्याने येथे नक्की काय घडतं हेच दाखवणारा व्हिडीओ रेल्वेने ट्विट केलाय.

रेल्वे मंत्रालयाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये मंडोवी नदीवरील या धबधब्यातून वेगाने पाण्याचा प्रवाह खाली कोसळत असल्याने रेल्वे थांबवावी लागली. पाण्यामुळे किंवा दुष्यमानता कमी असल्याने काही अपघात होऊ नये म्हणून खबरदारीच्या दृष्टीने काही काळासाठी रेल्वे दूधसागरसमोरील ब्रिजवर काही डब्बे असतानाच थांबवण्यात आली. या व्हिडीओमध्ये दूधसागर धबधब्यामधील पाणी पातळीत झालेली वाढही स्पष्टपणे दिसत आहे. वर्षातील काही महिने कोरडा असणारा हा धबधबा पावसाळ्यात मात्र आपल्या पूर्ण क्षमतेने वाहताना दिसतो. म्हणूनच तो पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे गर्दी करतात. या धबधब्यापर्यंत येण्यासाठी रेल्वे मार्गाच्या बाजूने काही किमीपर्यंत चालत यावं लागतं. तरीही अनेक पर्यटक अगदी उत्साहाने निसर्गाचे हे सुंदर रुप निवांतपणे न्याहळता यावे म्हणून येथे पावसाळ्यात आवर्जून हजेरी लावतात.  तुम्हीच पाहा या धबधब्याचा हा व्हायरल व्हिडीओ…

मंडोवी नदी पश्चिम घाटामधून पणजीपर्यंत वाहत येते. याच नदीवर दूधसागर धबधबा आहे. हा धबधब भगवान महावीर संरक्षित वनविभाग आणि मोलम राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरामध्ये येतो. मांडोवी नदी कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यात उगम पावते आणि गोव्याच्या राजधानीमधून अरबी समुद्राला मिळते. दूधसागर धबधबा हा देशातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक मानला जातो. या धबधब्याची उंची ३१० मीटर तर रुंदी ३० मीटर इतकी आहे. अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दिपिका पादुकोणच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटातील काही दृष्ये या ठिकाणी शूट करण्यात आलीय.

मागील काही दिवसांपासून कोकण आणि गोव्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस होत आहे. भारतीय हवामान विभागाने या भागांमध्ये या वर्षी पूर्ण क्षमतेने पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाय. तसेच या भागामध्ये ३० जुलै आणि ३१ जुलै रोजी मोठ्या प्रमाणात वर्षावृष्टी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. हवामानविभागाने या भागामध्ये ऑरेंज अलर्टही जारी केलाय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Viral video a train passing through dudhsagar waterfall in south western railway halted due to heavy rainfall scsg

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी