अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतली आणि देशावर पूर्णपणे तालिबान्यांनी कब्जा केला. त्यानंतर लगेचच अफगाणिस्तानातून तालिबान्यांची क्रूरता दाखवणाऱ्या बातम्या, व्हिडिओ, फोटो बाहेर येऊ लागले. अशाच एका व्हायरल व्हिडिओमागचं सत्य रॉयटर्स या माध्यमसंस्थेनं समोर आणलं आहे.

काय आहे व्हिडिओ?

काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत जे हेलिकॉप्टर उडत आहे त्याला खाली दोरीने एक मृतदेह लटकवला आहे. हा मृतदेह हेलिकॉप्टरला बांधून ते हेलिकॉप्टर तालिबानी कंदाहारवरुन फिरवताना दिसत आहेत, अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आहे.

अनेक पत्रकारांनी हा व्हिडीओ शेअर केला असून तालिबान्यांनी या व्यक्तीची निघ्रृणपणे हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह हेलिकॉप्टरला बांधल्याचं सांगितलं जात आहे. कंदाहार प्रांतावर नजर ठेवण्यासाठी सध्या तालिबान हे हेलिकॉप्टर वापरत असून आपली दहशत कायम ठेवण्यासाठी त्यांनी या हेलिकॉप्टरला मृतदेह बांधून तो शहरावरुन फिरवल्याचं सांगितलं जात आहे. अनेक स्थानिक प्रसारमाध्यमांनी तालिबान्यांनी या व्यक्तीची हत्या करुन नंतर मृतदेह हेलिकॉप्टरला बांधून शहरावरुन फिरवल्याचं म्हटलं आहे.

काय आहे सत्य?

ज्या हेलिकॉप्टरला ती व्यक्ती लटकलेली दिसत आहे ते हेलिकॉप्टर हे अमेरिकन हॉक आहे. तो हेलिकॉप्टरला लटकलेला व्यक्ती हा आकाशात तालिबानी झेंडा फडकवत होता. तसेच एका इमारतीवर तो तालिबानी झेंडा लावण्याचा प्रयत्न करत होता पण त्यामध्ये त्याला यश आलं नाही. रॉयटर्सने हा व्हिडिओ झूम करुन हे सत्य शोधलं असून त्यांनी अनेक जणांच्या ट्विट्सचे संदर्भही दिले आहेत.

या ट्विट्समध्ये लोकांनी या एकाच घटनेचे वेगवेगळ्या बाजूने काढलेले व्हिडिओ शेअर केले आहेत.या व्हिडिओंमध्ये ही व्यक्ती आपला हात हलवतानाही दिसत आहे.  ज्यातून हे सिद्ध होतं की हेलिकॉप्टरला बांधलेला मृतदेह नसून ती एक जिवंत व्यक्ती आहे. ही व्यक्ती तालिबान्यांच्यातलीच एक असून या हेलिकॉप्टरच्या साहाय्यानेच तिच्यावर नियंत्रण ठेवलं जात असण्याची शक्यता आहे.