Viral Video Air India air hostess retires after 35 years : काम कोणतेही असो; प्रत्येक कमर्चाऱ्याचा नोकरी सोडून जाताना निरोप समारंभ हा झालाच पाहिजे. कारण- प्रत्येक व्यक्ती दिवसभराचा अर्ध्याहून जास्त वेळ नोकरीसाठी देते. प्रत्येक कर्मचाऱ्याचे प्रयत्न, त्यांचे काम कंपनीला पुढे घेऊन जायला आणि कंपनीची ओळख वाढवायला मदत करतात. त्यामुळे दुसऱ्या कंपनीत नोकरी करायला जाण्याआधी त्या ठिकाणी दिला जाणारा निरोपाचा सन्मान सोहळा ही तुमच्या त्या दिवसापर्यंत केलेल्या कामाची पोचपावती असते. तर, आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

३५ वर्षे प्रवाशांचे विमानात स्वागत केल्यानंतर, एअर इंडियाच्या एका एअर होस्टेसने विमान प्रवासात तिच्या निवृत्तीची घोषणा केली. एअर होस्टेसची लेक संजना पार्थने हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिची आई नूपुर पार्थ एअर इंडियामध्ये कॅबिन क्रू म्हणून ३५ वर्ष काम करीत होत्या. शिकागो ते दिल्ली या त्यांच्या शेवटच्या फ्लाइटवर त्यांनी प्रवाशांसाठी नेहमीप्रमाणे घोषणा केली. ही प्रवाशांसाठी साधी, रोजची घोषणा नव्हती. तर त्यांचे सहकारी आणि कुटुंबासाठी तो खूप भावनिक क्षण होता.

क्रू सदस्य म्हणून तिचे शेवटचे उड्डाण (Viral Video)

एअर इंडियाच्या प्रतिष्ठित निळ्या साडीत सजलेल्या नूपुर नेहमीप्रमाणे बॅग घेऊन निघाल्या. त्यांच्या सहकाऱ्यांनी विमानातच छान ग्रीटिंग्स, केकची टेबलावर सजावट केली आणि केक कापला. सगळ्या एअर होस्टेस दोन्ही बाजूंना उभ्या राहिल्या आणि हातांनी घर करून, त्याखालून जाण्याचा सन्मान नूपुर यांना दिला. तसेच सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून त्यांच्याबरोबर ग्रुप फोटोदेखील काढला आणि अशा प्रकारे ३५ वर्षे सेवा केलेल्या एअर होस्टेसला सहकाऱ्यांनी निरोप दिला. एकदा बघाच हा व्हिडीओ…

व्हिडीओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा…

air hostes

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @midnight_ramblings31 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून चार दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘तिची शेवटची घोषणा. क्रू सदस्य म्हणून तिचे शेवटचे उड्डाण’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच नेटकरी व्हिडीओ पाहून “मी तुमच्याबरोबर हैदराबादमध्ये ट्रेनिंग केले. तुम्ही इतरांशी खूप छान वागता. तुमच्या पुढील आयुष्यात अनेक आनंदी आणि चांगली वर्षे येवोत, मॅम”, “एअर इंडियाच्या मुलींचा शिस्तप्रियता आणि सुंदर वर्तणूक हीच त्यांची खासियत आहे” आदी अनेकविध कमेंट्स व्हिडीओखाली करताना दिसत आहेत.