Viral Video: जंगलातील प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. अशा व्हिडीओंमधून वाघ, सिंह, बिबट्या किंवा इतर शिकारी प्राणी आपल्या नैसर्गिक अधिवासात अन्न मिळवण्यासाठी कशा प्रकारे शिकार करतात, याची झलक पाहायला मिळते. हे दृश्य अनेकदा थरारक वाटत असले, तरी ते निसर्गातील अन्नसाखळीचा आणि परिसंस्थेच्या संतुलनाचा नैसर्गिक भाग असतात. अशा व्हिडीओंमुळे वन्यजीवांचे वर्तन, त्यांची शिकार करण्याची पद्धत आणि जंगलातील जीवनचक्र समजून घेण्यास मदत होते.
जंगलातील अन्नसाखळी ही निसर्गातील सजीवांचे परस्परावलंबी नाते दर्शवते. वनस्पती या अन्नसाखळीचा पाया असतात, कारण त्या सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने स्वतःचे अन्न तयार करतात. त्यानंतर हरीण, ससा, झेब्रा किंवा इतर शाकाहारी प्राणी वनस्पतींवर उपजीविका करतात. पुढे वाघ, सिंह, बिबट्या, लांडगा यांसारखे मांसाहारी प्राणी या शाकाहारी प्राण्यांची शिकार करून अन्न मिळवतात. एखादा सजीव मृत झाल्यानंतर जीवाणू, बुरशी आणि इतर विघटन करणारे सूक्ष्मजीव त्याचे विघटन करून पोषक घटक पुन्हा मातीत मिसळतात. अशा प्रकारे जंगलातील अन्नसाखळी निसर्गातील संतुलन राखण्यास आणि प्रत्येक सजीवाच्या अस्तित्वासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.
हिमबिबट्या हा उंच पर्वतीय भागात आढळणारा दुर्मिळ आणि अत्यंत चपळ शिकारी प्राणी आहे. बर्फाच्छादित डोंगर, खडकाळ प्रदेश आणि कठीण हवामानातही तो सहज वावरू शकतो. त्याचे दाट राखाडी-पांढरे केस, लांब शेपटी आणि मजबूत पाय थंड वातावरणात जगण्यासाठी उपयुक्त ठरतात. हिमबिबट्या प्रामुख्याने आयबेक्स, निळी मेंढी आणि इतर पर्वतीय प्राण्यांची शिकार करून आपला उदरनिर्वाह करतो. त्याची शांत हालचाल, अचूक झेप आणि उत्कृष्ट चढाईची क्षमता यामुळे तो अत्यंत कुशल शिकारी मानला जातो.
हिमबिबट्या आणि आयबेक्स यांचे नाते हे पर्वतीय परिसंस्थेतील नैसर्गिक अन्नसाखळीचा महत्त्वाचा भाग आहे. हिमबिबट्या हा अत्यंत संयमी आणि कुशल शिकारी असून, खडकाळ आणि बर्फाच्छादित प्रदेशात तो सावधपणे आयबेक्सचा माग काढतो. योग्य संधी मिळताच तो वेगवान झेप घेत शिकार करण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडे, आयबेक्स आपल्या मजबूत खुरांच्या मदतीने उंच कडे आणि खडकाळ भागात चपळाईने वावरून शिकाऱ्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करतो. हिमबिबट्या आणि आयबेक्स यांच्यातील हे नाते निसर्गातील संतुलन राखण्यास महत्त्वाची भूमिका बजावते.
सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एक हिमबिबट्या डोंगराळ भागात आयबेक्सची शिकार करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय, परंतु यावेळी आयबेक्स हिमबिबट्याला पळवून लावतो.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ युट्यूबवरील @Debashis_Banerjee_WWE या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत अनेक एक मिलिनयहून अधिक व्ह्युज अन् लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “डोंगराच्या कडेने चालण्याची त्यांची क्षमता थक्क करणारी आहे.” एका युजरने लिहिलेय, “हाच तर फरक आहे… दोघांनाही आपली बलस्थाने आणि उणिवा माहित आहेत…!!!” आणखी एका युजरने लिहिलेय, “हिमबिबट्या… किती सुंदर”
