महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी एक्स (ट्विटर)वर शेअर केलेल्या अनेक पोस्ट युजर्सना आवडतात. त्यात अनेक मजेशीर, जुगाड व्हिडीओ, तसेच काही प्रेरणादायी पोस्टसुद्धा असतात; ज्या अनेकांचे लक्ष वेधून घेतात. तर नेहमीच जुगाड तंत्रज्ञानावर लक्ष ठेवून असणाऱ्या आनंद महिंद्रानी एक व्हिडीओ शेअर केला आहे. एका अरुंद रस्त्यावरून जाण्यासाठी एका तरुणाने केलेला जुगाड पाहून त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे.
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत एक अरुंद रस्त्यावर दोन गाड्या समोरासमोर उभ्या असतात. एका गाडीत तरुण; तर दुसऱ्या गाडीत एक तरुणी असते. पण, या अरुंद रस्त्यावरून एकाच वेळी दोन्ही गाड्या घेऊन जाणे आणि यू-टर्न घेणेही शक्य नसते म्हणून तरुण एक अनोखा स्टंट करतो. तरुणी तिची गाडी रस्त्याच्या कडेला उभी करते. तसेच बाजूला अगदीच कमी जागा असल्यामुळे तरुण त्याची गाडी भिंतीवरून चालवत घेऊन जाऊन, तो अरुंद रस्ता अगदी सहज पार करतो. तरुणाचा हा अनोखा जुगाड एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून पाहा.
हेही वाचा…काकूंनी मॉलमधून महिनाभराचे सामान भरले पायजम्यात अन् चोरून पळणार तितक्यात…; पाहा व्हायरल Video
पोस्ट नक्की बघा :
चित्रपटातील एखाद्या भांडणाच्या सीनदरम्यान हवेत गाडी उडते किंवा अभिनेता भिंतीवरून गाडी घेऊन जातो, अशी दृश्ये तुम्ही अनेकदा पाहिली असतील. तर असाच एक व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी पाहिला आणि त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडीओ त्यांच्या अकाउंटवर शेअर करीत त्यांनी लिहिले की, थांबा….काय?? ठीक आहे. मला असे वाटते की, एकमेकांशी भांडण्यापेक्षा हे चांगले आहे. पण, जसे नेहमीप्रमाणे म्हटले जाते तसे ‘हे घरी करून पाहू नका…’ अशी कॅप्शनही त्यांनी या व्हिडीओला दिली आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांच्या अधिकृत @anandmahindra या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून एका युजरने कमेंट केली आहे की, बहुतेक तरुणाने दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या चित्रपटातून प्रेरणा घेतली आहे. तर, काही नेटकरी आनंद महिंद्रा यांच्याकडे महिंद्रा थारमध्येही असे फीचर हवे, अशी मागणी करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.
