Viral Video: जंगलातील प्रत्येक प्राण्याची शिकार करण्याची पद्धत वेगळी आणि त्यांच्या शरीररचनेनुसार विकसित झालेली असते. काही प्राणी आपल्या वेगाचा वापर करून शिकारीचा पाठलाग करतात, तर काही दबा धरून योग्य संधीची वाट पाहतात. सिंह, वाघ यांसारखे शिकारी प्राणी शांतपणे जवळ जात अचानक हल्ला करण्यासाठी आपल्या ताकदीचा आणि चपळाईचा वापर करतात. चित्त्यासारखे प्राणी वेगासाठी ओळखले जातात. मगर पाण्यात लपून बसून पाणी पिण्यासाठी किंवा जवळ येणाऱ्या प्राण्याची संधी साधू शकते. गरुड, ससाणा यांसारखे पक्षी आकाशातून आपल्या भक्ष्यावर लक्ष ठेवून योग्य क्षणी झेप घेतात. तर काही साप विष किंवा शरीराच्या ताकदीचा वापर करून भक्ष्याला निष्क्रिय करतात. त्यामुळे जंगलातील शिकारीची प्रत्येक पद्धत ही त्या प्राण्याच्या वेग, ताकद, दात, नखे, विष, चपळाई आणि नैसर्गिक अधिवासाशी जोडलेली असते.

जंगलातील प्राणी आणि पक्ष्यांचे अनेक आश्चर्यकारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात. जंगलातील प्राण्यांचे शिकारीचे थरारक प्रसंग, एकमेकांमधील संघर्ष, पाणवठ्यावरची त्यांची लगबग तसेच त्यांच्या दैनंदिन जीवनातील वेगवेगळे क्षण कॅमेऱ्यात कैद होतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच त्यांना मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळतात आणि नेटकऱ्यांकडूनही विविध प्रतिक्रिया दिल्या जातात.

जंगलातील अन्नसाखळी ही निसर्गातील संतुलन टिकवून ठेवणारी महत्त्वाची व्यवस्था आहे. जंगलात प्रत्येक जीव प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो. गवत, पाने, फळे आणि इतर वनस्पती हे अन्न म्हणून तृणभक्षी प्राणी खातात. हरीण, काळवीट, वॉटरबक, रानडुक्कर यांसारखे प्राणी वनस्पतींवर अवलंबून असतात. त्याच वेळी सिंह, वाघ, बिबट्या, मगर यांसारखे मांसाहारी प्राणी या तृणभक्षी किंवा इतर प्राण्यांची शिकार करून आपले भक्ष्य मिळवतात. याशिवाय साप, गरुड, घुबड यांसारखे शिकारीही अन्नसाखळीतील महत्त्वाची भूमिका बजावतात. एखाद्या प्रजातीची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली किंवा वाढली, तर त्याचा परिणाम इतर प्राण्यांवरही होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक जीवाचे जंगलातील परिसंस्थेत विशिष्ट महत्त्व असून, अन्नसाखळीमुळे जंगलातील नैसर्गिक समतोल टिकून राहण्यास मदत होते.

हिमबिबट्या हा उंच पर्वतीय आणि अतिशय थंड प्रदेशात आढळणारा दुर्मीळ मोठा मांजरवर्गीय प्राणी आहे. त्याच्या अंगावरील राखाडी-पांढऱ्या रंगाची दाट फर आणि काळे ठिपके त्याला बर्फाळ वातावरणात लपण्यासाठी मदत करतात. मजबूत पाय, लांब शेपटी आणि चपळ शरीररचना यामुळे तो उंच, खडकाळ पर्वतीय भागात सहज हालचाल करू शकतो. हिमबिबट्या हा मांसाहारी शिकारी असून भरल, आयबेक्स, हिमालयीन ताहर यांसारख्या प्राण्यांची शिकार करतो. तो दबा धरून योग्य संधी साधत भक्ष्यावर झडप घालण्यासाठी ओळखला जातो. त्याची लांब शेपटी शरीराचा समतोल राखण्यास आणि थंडीपासून काही प्रमाणात संरक्षण देण्यास मदत करते. त्यामुळे हिमबिबट्याला पर्वतीय परिसंस्थेतील महत्त्वाचा शिकारी मानले जाते.

या व्हिडीओमध्ये एक हिमबिबट्या बर्फाळ प्रदेशात एका प्राण्याचा थरारकपणे पाठलाग करताना दिसत आहे. भक्ष्याच्या दिशेने वेगाने धावत हिमबिबट्या त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. मात्र प्रसंगावधान राखत त्या प्राण्याने पाण्यात उडी मारली आणि हिमबिबट्याच्या तावडीत सापडण्यापासून आपला जीव वाचवला. हा थरारक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @BBC Earth या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “प्राणीसृष्टीतील कदाचित सर्वात सुंदर शेपटी हिमबिबट्याची असते.” एका युजरने लिहिलेय, “हे व्हिडिओ पाहताना मी खऱ्या पेचात पडतो. मला कधीच असं वाटत नाही की भक्ष्याचा मृत्यू व्हावा, पण शिकारी प्राण्यांनी उपासमारीने मरावं असंही मला नको असतं. एका प्राणीप्रेमीची ही द्विधा मनस्थिती.” आणखी एका युजरने लिहिलेय, “हिमबिट्यासाठी पण वाईट वाटलं”