Viral Video Of Fight: विद्या विनयेन शोभते असं म्हणतात पण बहुतांश वेळा सोशल मीडियावर अगदी सुशिक्षित व्यक्तीच लज्जास्पद काम करताना दिसून येतात. यातीलच एक ताजे उदाहरण गुरुग्राममध्ये पाहायला मिळाले आहे. सेक्टर ५० मधील क्लोज नॉर्थ अपार्टमेंटमध्ये लिफ्टमध्ये थोड्यावेळ अडकल्यानंतर एका व्यक्तीने सुरक्षा रक्षक आणि लिफ्ट ऑपरेटरला जबरदस्त मारहाण केल्याचे समजतेय. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी व्हिडिओमध्ये मारहाण करणाऱ्या व्यक्तीची निंदा करत हा श्रीमंतीचा अहंकार आहे असं म्हंटल्याचे दिसतेय.

प्राप्त माहितीनुसार, सुरक्षा रक्षकाने लिफ्टमध्ये अडकलेल्या व्यक्तीला अवघ्या ३ ते ४ मिनिटांत लिफ्टमधून बाहेर पडण्यास मदत केली. मात्र तो बाहेर पडताच त्याने सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. अशोक कुमार असे या सुरक्षा रक्षकाचे नाव असून त्यांनी एएनआयशी संवाद साधताना ही माहिती दिली. कुमार यांच्यासह लिफ्ट ऑपरेटरलाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सुरक्षा रक्षकांकडून सांगण्यात येत आहे.

(महागाईचा हाहाकार! टोमॅटो ५०० रुपये तर कांदे…; पाकिस्तानमधील भाज्यांचे दर पाहून तोंडचं पाणी पळेल)

वरुण नाथ असे या मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. मारहाणीनंतर सुरक्षा रक्षकांनी एकत्र येऊन इमारतीच्या दारावर ठिय्या आंदोलन केले. हा गोंधळ पाहून सेक्टर ५० पोलिस ठाण्यातील पोलीस निरीक्षक राजेश कुमार यांनी घटनास्थळी भेट दिली व तक्रारही नोंदवून घेतली. सुरक्षा रक्षकांच्या तक्रारीनंतर आता भारतीय दंड संहिता (IPC) चे कलम 323 (दुखापत करणे) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) या अंतर्गत नाथ यांना अटक करण्यात आली आहे.

पहा ट्वीट

दरम्यान काही दिवसांपूर्वीच नोएडातील एका महिलेला गृहनिर्माण सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या महिलेला अटक करण्यात आली होती. या प्रसंगाच्या पाठोपाठ गुरुग्राममधील हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.