viral video auto driver bond with pet parrot : प्राणी आणि पक्ष्यांना माणसांप्रमाणेच प्रेम, स्वातंत्र्य हवे असते. प्राणीप्रेमी तर खूप असतील; पण पक्षीप्रेमी फार कमी बघायला मिळतात. त्यामुळे अनेक जण आवडीने पोपट, लव्ह बर्ड, चिमणी यांसारखे विविध पक्षी घरात पाळतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
एका पक्षीप्रेमी व्यक्तीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्रॅफिक, हॉर्न, घाईघाईने ये-जा करणाऱ्या प्रवाशांमध्ये, एका लहान हिरव्या पोपटाने शांतपणे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. इन्स्टाग्राम युजर आकाशने बंगळुरूमधील एक स्थानिक रिक्षाचालकाचा व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये त्याच्याबरोबर एक पाळीव पक्षी पोपटसुद्धा होता. चालक त्याच्या पाळीव पोपटाला शेजारी बसवून, संपूर्ण दिवस रिक्षा चालवतो असे या इन्स्टाग्राम युजरचे म्हणणे आहे.
हा पक्षी पिंजऱ्यात बसत नाही, रिक्षात मुक्तपणे फिरतो, रिक्षाचालकाच्या आवाजाला प्रतिसाद देतो, त्याच्या छोट्या सूचनादेखील तो लक्षपूर्वक ऐकतो. हे पाहून इन्स्टाग्राम युजर आकाशने छोटीशी इच्छा व्यक्त केली आणि रिक्षाचालकाने ती पूर्णसुद्धा केली. पोपट माझ्या खांद्यावर बसू शकतो का, असे सहज विचारताच हसत-हसत रिक्षाचालकाने परवानगी सुद्धा दिली. एकदा बघाच रिक्षाचालक आणि त्याच्या पाळीव पोपटाचा व्हायरल व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
पोपट आपल्या छोट्या नखांनी इन्स्टाग्राम युजरच्या खांद्याला अलगद स्पर्श करतो, कुतूहलाने डोके वाकवतो. त्यामुळे पक्षी आपल्या दैनंदिन आयुष्यात किती खोलवर रुजलेले असतात हे समजते. पक्षी भावना व्यक्त करण्याचं काम करतात, ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो; पण, इन्स्टाग्राम युजरला स्वतः ते अनुभवायला मिळाले.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @aakashvaani.mp3 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शनमध्ये त्याने पोपटासाठी काही खास गाणी लिहिली आहेत. नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि “आज इंटरनेटवर पाहिलेली सगळ्यात गोड गोष्ट”, “देव तुम्हा दोघांचंही भलं करो” आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत.
