Auto driver video: आजकाल सोशल मीडियाचं जग म्हणजे रील्सचं साम्राज्य झालं आहे. बमध्ये, रस्त्यावर, ऑफिसमध्ये, अगदी जेवतानासुद्धा लोक मोबाईलवर रील्स स्क्रोल करताना दिसतात. पण, हे वेड आता केवळ वेळेचा अपव्यय राहिलेला नाही, तर सुरक्षेसाठी तो एक गंभीर धोका बनत चाललं आहे. ही बाब अधोरेखित करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये बिहारचा एक रिक्षाचालक गाडी चालवताना त्याच्या मोबाईलवर रील स्क्रोल करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर सध्या बिहारमधील एका रिक्षाचालकाचा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक अक्षरशः थक्क झाले आहेत. कारण- रिक्षाचालक गाडी चालवत असतानाच मोबाईलवर रील्स स्क्रोल करताना दिसत आहे. ही घटना केाळ रिक्षामधील प्रवाशांसाठीच नव्हे, तर रस्त्यावरच्या इतर लोकांसाठीसुद्धा धोकादायक असल्याचं नेटिझन्सनी उल्लेख केला आहे. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने ही घटना एक गंभीर इशारा देणारी आहे.
हा व्हिडीओ एका महिलेनं स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून, ती स्वतः त्या रिक्षामध्ये प्रवास करीत होती. तिनं सांगितलं की, सुरुवातीला तिला वाटलं की, ड्रायव्हर मोबाईलवर काहीतरी तपासत असेल; परंतु काही क्षणांतच तिच्या लक्षात आलं की, तो रील्स स्क्रोल करीत असून, त्यांना शेअरसुद्धा करीत आहे. रिक्षा चालविताना तो एका हाताने गाडी सांभाळतोय आणि दुसऱ्या हाताने मोबाईलवर बिनधास्त रील्स पाहतोय. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.
पाहा व्हिडिओ
हा व्हिडीओ ‘iam_anjalisingh’ नावाच्या इन्स्टाग्राम युजरने ऑगस्ट महिन्यात पोस्ट केला होता. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ’मला त्याच्या या वागण्यामुळे भीती वाटू लागली आणि मी शेवटी त्याला स्क्रोल करणं थांबवायला सांगितलं.’ तिच्या या पोस्टनंतर व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने पसरला. हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.
नेटिझन्सनी विनोदी, तसेच टीकात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं लिहिलं, “रीलपेक्षा महत्त्वाचं काही नाही.” दुसऱ्या युजरनं लिहिलं, “या ऑटोचालकाला ’रीलपगलू’ असं टोपणनाव दिलं पाहिजे.“ तिसऱ्या युजरनं लिहिलं, “देव तुमचे रक्षण करो. अशा घटना पाहून रस्ता सुरक्षेबाबत प्रशासन आणि प्रवाशांनीही अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.
