Tiny Turtle Climbing Stairs Viral Video : सोशल मीडिया हे असं एक माध्यम आहे जिथे रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण यातील काही व्हिडिओ थेट काळजाला भिडणारे असतात. सध्या असाच एका छोट्याशा कासवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. जो पाहून नेटकरी चकितचं झाले नाही तर जीवनाचा एक मोठा धडाही दिला आहे.

वारंवार घसरला, पण हार नाही मानली!

पावसामुळे पूर्णपणे ओल्या आणि प्रचंड घसरड्या झालेल्या दगडी पायऱ्या चढण्याचा हा चिमुकल्या कासवाचा प्रयत्न सुरु होता. आकाराने अत्यंत लहान असलेलं हे कासव एक-एक पाऊल पुढे टाकतंय. पण पायऱ्यांवरून ते वारंवार खाली घसरत होते. पण अपयश येऊनही त्याचे पाय काही थांबले नाही. अपयशानंतरही हार न मानता, पुन्हा नव्या जोमाने ते वर चढण्याचा प्रयत्न करत राहिले.

अनेक अपयशानंतर यश!

अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर, अखेर ते कासव सर्वात वरच्या पायरीवर यशस्वीपणे पोहोचते. कासवाचा हा विजयी क्षण कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या आणि आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांचाही आनंद गगनात मावेनासा होतो. व्हिडिओतील लोक या छोट्या जीवाच्या यशावर टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.

नेटकरी म्हणाले, “वेगापेक्षा सातत्य महत्त्वाचे!”

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी या कासवाच्या चिकाटीचे आणि अफाट जिद्दीचे कौतुक केले आहे. “जीवनात वेग किती आहे यापेक्षा तुमचं सातत्य किती महत्त्वाचं आहे, हे या छोट्याशा जीवाने दाखवून दिलं,” अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. कासवाची चाल जरी संथ असली, तरी ध्येयापर्यंत पोहोचण्याची त्याची धडपड सध्या लाखो लोकांच्या जगण्याची प्रेरणा बनत आहे.