scorecardresearch

Viral Video : “युपी में का बा?” रवी किशनच्या गाण्यावर भोजपुरी गायिकेचा हल्लाबोल

रवी किशन यांच्या ‘यूपी में सब बा’ या गाण्यावर एका भोजपुरी गायिकेने ‘यूपी में का बा?’ असं म्हणत योगी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

UP mein ka baa
नेहा सिंग राठोड ही कोणतीही राजकीय व्यक्ती नाही परंतु तिच्या 'युपी में का बा?' या गाण्याने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. (प्रातिनिधिक फोटो)

भारतातील ५ राज्यांमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधाकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळी खेळली जातेय. नुकतंच रवी किशन याने उत्तर प्रदेशातील योगी सरकारची प्रशंसा करणारे ‘यूपी में सब बा’ हे भोजपुरी गाणं रिलीज केलं. या गाण्यावर भोजपुरी शैलीतच प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. एका भोजपुरी गायिकेने रवी किशन यांच्या या गाण्यावर ‘यूपी में का बा?’ असं म्हणत योगी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?

नुकतेच खासदार रवी किशन यांचे एक भोजपुरी गाणे सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले. ‘यूपी में सब बा’ असं या गाण्याचे नाव आहे. या गाण्यात त्यांनी योगी सरकारने केलेल्या कामांचा पाढाच वाचून दाखवला आहे. दरम्यान, या गाण्याला भोजपुरी भाषेतच उत्तर देण्यात आलं आहे. भोजपुरी गायिका नेहा सिंग राठोड हिने स्वतः ‘यूपी में का बा?’ हे गाणं लिहून सादर केलं आहे. या गाण्याच्या माध्यमातून तिने योगी सरकारवर टीकास्त्र सोडले असून या गाण्यात उत्तर प्रदेशातील करोना काळातील गैरव्यवस्थापन, लखीमपूर हिंसाचाराची घटना आणि भाजपाच्या मंदिर राजकारणाचा उल्लेख करण्यात आला आहे.

हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं असून विरोधी पक्षातील नेत्यांनी हे गाणं डोक्यावर घेतलं आहे. महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही हे गाणं त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलं आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षातील सुरेंद्र राजपूत, राष्ट्रीय जनता दल पक्षाचे अरुण कुमार यादव यांनी देखील हे गाणं शेअर केले आहे. नेहा सिंग राठोड ही कोणतीही राजकीय व्यक्ती नाही परंतु तिच्या या गाण्याने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे.

२०२२च्या निवडणुकांमध्ये ‘हे’ अ‍ॅप्स निभावणार महत्वाची भूमिका; जाणून घ्या काय आहेत फायदे

कोण आहे नेहा सिंग राठोड ?

नेहा ही भोजपुरी भाषेमध्ये गाणी लिहिते आणि सादर करते. धरोहर नावाचे तिचे युट्यूब चॅनेल आहे. २०२०मध्ये भाजपाने बिहार निवडणुकीसाठी ‘बिहार मे का बा’ नावाचं गाणं तयार केलं होतं. यामध्ये बिहारमधील परिस्थिती सुधारली असून बराच विकास झाला आहे असा प्रचार भाजपाने केला होता. तिने बिहारमध्ये काय आहे हे सांगणारं ‘ला सुना जवाब… का बा बिहार में?’ हे गाणं स्वत: लिहिलं आणि खास बिहारमधील लोककलाकारांप्रमाणे सादर केलं. या गाण्यामध्ये तिने बिहारमधील आरोग्य व्यवस्थेपासून ते जनतेऐवजी नेत्यांना खुर्ची महत्वाची असण्यापर्यंत, अनेक गोष्टींवरुन राजकारण्यांना चिमटे काढले होते. नेहाने केवळ ढोलकीच्या तालावर गायलेल्या या गाण्यात बिहारमधील रुग्णालयांमध्ये कर्माचाऱ्यांचा तुटवडा आहे, स्वच्छता नाही, रुग्णवाहिका नाही, व्हेंटीलेटर्स नाहीत हे अगदी क्रिएटीव्ह पद्धतीने सांगितलं आहे. पुढे याच गाण्यात तिने राजकारण्यांना जनतेशी काही घेणं देणं नसून त्यांना खुर्चीच महत्वाची असते असा टोलाही लगावला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video bhojpuri singer attack on yogi government through her song pvp

ताज्या बातम्या