boss gifts employees iPhones : बॉस आणि कर्मचारी यांच्यातील नातं थोडं आंबट-गोड असतं. त्यामुळे कामाची पोचपावती, बॉसने दिलेली एखादी भेटवस्तू किंवा कौतुकाचे दोन शब्द हे कर्मचाऱ्यासाठी काम करण्याचा उत्साह वाढवणारे ठरतात. अशा छोट्या गोष्टींमुळे कर्मचाऱ्यांना आपल्या कामाची दखल घेतली जात असल्याची भावना निर्माण होते आणि ते अधिक उत्साहाने काम करण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील एका कंपनीने कर्मचाऱ्यांना खूप जबरदस्त सरप्राईज दिले. हा व्हिडीओ ‘वर्ल्ड स्टार मॅनपावर’ (World Star Manpower) या UAE-स्थित मॅनपावर पुरवठा करणाऱ्या कंपनीचे संस्थापक निषाद हुसेन आणि कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक (MD) असलेल्या त्यांच्या पत्नी हसीना निषाद यांनी पोस्ट केला आहे.

त्यांनी कर्मचाऱ्यांपुढे पुढे काही भेटवस्तूंचे बॉक्स ठेवले, ज्यामध्ये आयफोन (iPhone) किंवा चॉकलेट्स ठेवण्यात आले होते. कर्मचाऱ्यांनी बॉक्स उघडल्यावर काही जणांना आयफोन तर अनेक जणांना चॉकलेट्स भेट म्हणून मिळाले. मग कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक (MD) हसीना निषाद यांनी आणखीन एक सरप्राईज दिले, तेव्हा वातावरणच बदलून गेले.

ज्या कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला चॉकलेटचे बॉक्स निवडले होते, त्यांनाही त्यांनी आयफोन भेट दिले; अशा प्रकारे प्रत्येकाला आयफोन मिळाला याची त्यांनी खात्री केली. ज्यांनी चॉकलेट्स निवडले होते त्यांनाही वंचित ठेवले जाणार नाही हे समजल्यावर कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले भावही या व्हिडिओमध्ये टिपले गेले आहेत. भेटवस्तू निवडण्याच्या एका साध्या उपक्रमाचे रूपांतर सर्वांसाठी एका सुखद धक्क्यामध्ये झाले आणि यामुळेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय ठरला.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @haseena_nishad या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “व्यवस्थापकीय संचालक म्हणून, त्यांचा असा विश्वास आहे की, खरे यश हे आपल्या लोकांची निष्ठा, सकारात्मक वृत्ती आणि सामूहिक सामर्थ्य यातून मिळते! प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक कल्पना आणि प्रत्येक योगदान आपल्याला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यांनी कर्मचाऱ्यांना त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यास, प्रगतीच्या संधी स्वीकारण्यास आणि एकमेकांना सहकार्य करत राहण्यास प्रोत्साहित केले” असे त्यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हंटले आहे.