Viral Video British husband taking blessings from grandmother : नातं कोणतंही असो, त्या नात्यात प्रेम आणि आदर असणं खूप महत्त्वाचं असतं. मग ते लग्न असो, प्रेम असो वा मैत्री. तुमच्यातील नात्यात विश्वास आणि प्रेमाइतकाच आदरही महत्त्वाचा असतो. एखाद्याबद्दल आदर किंवा प्रेम दाखविताना तुम्हाला भाषेची नाही, तर अगदी मनापासून दाखवलेल्या आपुलकीची गरज असते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये आजी आणि परदेशी जावयाची सुंदर भेट एका व्हिडीओद्वारे दाखवण्यात आली आहे, जे पाहून तुमचंही मन भारावून जाईल…

एका कपलने @The Brit Bong Diary या इन्स्टाग्राम अकाउंटवरून व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये कॉनोर (Conor) हा ब्रिटिश मुलगा म्रितीका (Mrittika) च्या वयोवृद्ध आजीला भेटताना दिसतो. भारतीय बायकोच्या म्हणण्यानुसार ब्रिटिश नवरा आजीच्या पाया पडताना दिसतो. दोघांना एकमेकांची भाषा समजत नसली तरीही ब्रिटिश मुलगा नम्रपणे खाली वाकून त्यांच्या पायांना स्पर्श करतो. भारतात मोठ्यांच्या पायाला स्पर्श करणे ही आशीर्वाद घेण्याची, त्यांचा आदर करण्याची एक जणू भाषा आहे. त्यामुळे हे पाहून आजी आनंदी होतात आणि त्याला प्रेमाने आशीर्वाद देतात.

“आदर ही भाषा प्रत्येकाला समजते” (Viral Video)

आजी फक्त आशीर्वाद देत नाही, तर अगदी नेहमीप्रमाणे नातवंडांच्या हातावर पैसे टेकवते तशी त्या जावयाच्या हातावर पैसे टेकवते. नातीने ८९ वर्षांची पणजी आणि ब्रिटिश नवऱ्याचा हा सुंदर क्षण सोशल मीडियावर शेअर केला आहे. दोघांनाही एकमेकांची भाषा समजत नव्हती. पण, त्या क्षणी त्यांना भाषेची गरजच नव्हती. फक्त थोडासा आदर, आशीर्वाद घेण्याची ती कृती ब्रिटिश जावयाला कुटुंबाचा नकळत एक भाग बनवून गेली. काही गोष्टी शिकवाव्या लागत नाहीत. त्या मनापासून जाणवतात, जपल्या जातात आणि त्यांचा आदरही नकळत केला जातो. जेव्हा आपण लोकांना प्रेमाने स्वीकारतो, तेव्हा भाषा, संस्कृती कधीच अडथळा वाटत नाही…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @the.brit.bong.diary या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीसुद्धा “पत्नीच्या भावनांचा आदर करून तिच्या आजीच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला”, “आजींना शब्दांशिवायही प्रेम समजते”, “अशा परंपरा पिढ्यांना आणि संस्कृतींना जोडतात”, “आदर ही अशी भाषा आहे, जी प्रत्येकाला समजते” आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत.