Bull And Little Girl Viral Video: बैल शेतकऱ्याचा जवळचा मित्र आहे. तो शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून वर्षभर शेतात राबत असतो. त्यामुळे शेतकऱ्याचा बैलावर अगदी पोटच्या मुलाप्रमाणे किंवा त्याच्यापेक्षा जास्त जीव असतो. त्यामुळे बैलासाठी शेतकरी आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी लावलेला लळा त्याच्यासाठी स्वर्गसुखाप्रमाणे असतो. आज असेच एक दृश्य सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहे. त्यामध्ये चिमुकलीसमोर बैल अगदी छोट्या भावाप्रमाणे डोके झुकवून उभा आहे; जे पाहून तुमचेही डोळे भरून येतील.

व्हायरल व्हिडीओ गावाकडचा आहे. गोठ्यात बैलाला बांधून ठेवले आहे. तर बैलासमोर एक चिमुकली उभी आहे. चिमुकली बैलाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवून, त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसते आहे. तर बैल अगदी आपल्या लहान बहिणीसमोर उभा असल्याप्रमाणे डोके झुकवून उभा आहे. बैलाने डोके झुकवले असल्यामुळे त्याची हुबेहूब नक्कल करताना चिमुकलीसुद्धा दिसते आहे. रक्ताच्या पलीकडील भावा-बहिणीचे हे नाते अगदी शब्दांत मांडणे कठीण आहे.

छोट्या ताईच्या प्रेमापुढे झुकताना महादेवाचा नंदी (Viral Video)

अनेकदा बैल हल्ला करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. १५ ते २० जणांना पकडणे कठीण जाईल, असे रूप कधी कधी बैलाच्या जोडीचे दिसतात. पण, या मुक्या प्राण्यांमध्येही प्रेम, आदर करण्याची भावना असते हे अनेक जण विसरूनच जातात. तर आज व्हायरल व्हिडीओत त्याचे एक उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. मायेने हात फिरवणाऱ्या चिमुकलीसमोर बैल राजासुद्धा स्वतःला लहान मानू लागला. वाघाच्या ताकदीचा नंदी प्रेमापुढे नम्र होताना दिसला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @samir_rakshe_bailgada_sanghtna या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि “मैदानात १०-१० माणसांना न आवरणारा, या चिमुकल्या जीवासमोर झुकून उभा आहे”, “रक्ताच्या पलीकडलं. भावा-बहिणीच एक अतूट नातं”, “वाघासारखी ताकद असताना; पण एका छोट्या ताईच्या प्रेमापुढे झुकताना महादेवाचा नंदी”, “हे फक्त शेतकऱ्यांच्या मुलीलाच जमतं. बाकी कोणाची हिंमत होत नाही” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसत आहेत.