Fact Check Viral Video : ‘लाइटहाऊस जर्नलिझम’ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जाणारा ३२ सेकंदांचा एक व्हिडीओ आढळला. या व्हिडीओमध्ये स्पीअर कॉर्प्स (३ कॉर्प्स)चे जनरल ऑफिसर कमांडिंग (GOC) लेफ्टनंट जनरल गिरीश कालिया (AVSM, VSM) बोलताना ऐकू येतात.
“आक्रमक चीनने अरुणाचल प्रदेशातील असाफिला, लोंगजू व ताकसिंग सर्कलवर ताबा मिळवला आहे, ही खरोखरच लज्जास्पद बाब आहे. आम्ही केंद्र सरकारकडे रसद पुरवण्याची विनंती करत आहोत; मात्र चीनविरुद्ध वापरण्याऐवजी निमलष्करी दले अरुणाचल प्रदेशातील Gen Z विरुद्ध तैनात करण्यात यावीत, असे आम्हाला सांगितले जात आहे,” असे ते म्हणत असल्याचा दावा या व्हिडीओत करण्यात आला आहे.
व्हिडीओमध्ये त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, त्यांच्या २५ हून अधिक सैनिकांना अटक करण्यात आली आहे आणि ते कुठे आहेत याबद्दल त्यांना काहीही माहिती नाही. तपासणीदरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ डीपफेक आहे आणि त्याबरोबरचा दावा खोटा आहे.
काय होत आहे व्हायरल?
व्हायरल व्हिडीओ एक्स (ट्विटर) @unkownnewss अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
इतर युजर्सदेखील याच दाव्यासह हा व्हिडीओ शेअर करीत आहेत…
https://twitter.com/JagrookSiraj/status/2114786686786060466
तपास
लेफ्टनंट जनरल गिरीश कालिया यांनी असे काही विधान केले आहे का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही बातम्या तपासून तपास सुरू केला. मात्र आम्हाला अशी कोणतीही बातमी आढळली नाही.
त्यानंतर आम्ही व्हिडीओतील महत्त्वाच्या फ्रेम्स (keyframes) वापरून रिव्हर्स इमेज सर्च केले. याद्वारे आम्हाला ANI च्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून २७ ऑक्टोबर २०२३ रोजी पोस्ट केलेल्या एका मूळ व्हिडीओचा शोध लागला.
या व्हिडीओमध्ये गिरीश कालिया अरुणाचल प्रदेशातील परिस्थितीबाबत कोणतेही विधान करताना दिसत नाहीत. उलट, या व्हिडीओमध्ये २८ इन्फंट्री डिव्हिजनचे जीओसी मेजर जनरल गिरीश कालिया जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीबाबत बोलताना दिसतात. ते म्हणतात, “जम्मू-काश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी आणि सुरक्षा वातावरण बिघडवण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LoC) पलीकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.”
भारतीय लष्करानेही त्यांच्या अधिकृत फॅक्ट चेक (एक्स) पेजवर खरी माहिती पोस्ट केली आहे…
आम्ही हा व्हिडीओ detectvideo.ai या AI डिटेक्शन टूलद्वारे तपासला; या टूलने दिलेल्या निष्कर्षांनुसार हा व्हिडीओ फेरफार केलेला (manipulated) असण्याची दाट शक्यता आहे.

निष्कर्ष
अरुणाचल प्रदेशातील काही भागांवर चीनने ताबा मिळवल्याचे लेफ्टनंट जनरल गिरीश कालिया यांनी मान्य केल्याचा दावा करणारा व्हायरल व्हिडीओ डीपफेक आहे. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी ANI ने पोस्ट केलेल्या मूळ व्हिडीओमध्ये गिरीश कालिया जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील (LoC) सुरक्षा आव्हानांबाबत बोलताना दिसतात. या व्हिडीओमध्ये अरुणाचल प्रदेशचा कुठेही उल्लेख नाही. भारतीय लष्करानेही हा व्हिडीओ बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, AI डिटेक्शन टूलच्या तपासणीतही व्हिडीओमध्ये फेरफार केल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ आणि त्यासोबत केला जाणारा दावा खोटा आहे.
