Viral Video Cow Veronika : निसर्गात वावरणाऱ्या प्रत्येक प्राण्याचे काही खास अशी वैशिष्ट्ये असतात. ही वैशिष्ट्ये त्या प्राण्यांना वेगळी बनवत असतात. पृथ्वीवर अनेक जातीचे प्राणी आढळतात. त्यातील काही प्राणी झाडावर, पाण्यात तर स्वतः बनवलेल्या घरांमध्ये राहणं पसंत करतात. पण, प्रत्येकाचा अन्न, पाण्यासाठीही संघर्ष सुरूच असतो; फक्त प्रत्येकाची पद्धत निराळी असते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही…
ऑस्ट्रियामधील नॉत्श इम गायलटाल या छोट्या गावात एका शेतात राहणारी व्हेरोनिका ही गाय गेल्या जवळपास दहा वर्षांपासून एक आगळं-वेगळं वर्तन करते. ती तोंडाने लाकडी ब्रश उचलते आणि त्यांचा वापर करून पाठीवर किंवा शरीराच्या इतर भागांवर खाजवते जिथपर्यंत ती अजिबात पोहचू शकत नाही. अलीकडेच व्हिएन्ना येथील युनिव्हर्सिटी ऑफ व्हेटरिनरी मेडिसिनमधील तज्ज्ञांनी तिच्या या कृतीचे व्हिडीओ पाहिला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, हे खूपच विशेष आहे. ही कृती प्राण्यांमध्ये फारच दुर्मीळ मानली जाते; असे सीएनएनने सांगितले आहे.
यानंतर संशोधकांनी तिच्या क्षमतेचा अधिक अभ्यास करण्यासाठी नियंत्रित प्रयोग केले. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने एक ब्रश व्हेरोनिका समोर ठेवला. ती तो ब्रश जिभेच्या मदतीने कसा उचलते, कोणता टोक निवडते आणि शरीराच्या कोणत्या भागावर वापरते, याकडे त्यांनी बारकाईने लक्ष दिलं. व्हेरोनिका फक्त साधनांचा विचारपूर्वक वापर करत नव्हती, तर ती निर्णय घेण्याची क्षमताही दाखवत होती. शरीराच्या वरच्या, जाड कातडीच्या भागासाठी ती ब्रशचा केसाळ भाग वापरत होती, तर थनासारख्या संवेदनशील भागांसाठी ती ब्रशचा गुळगुळीत दांडा वापरत होती.
व्हिडीओ नक्की बघा…
ही गोष्ट ‘करंट बायोलॉजी’ या जर्नलमध्ये प्रकाशित सुद्धा झाली आहे. कारण संशोधकांच्या मते, पाळीव गायीमध्ये साधनांचा वापर केल्याची ही पहिलीच नोंदवलेली घटना आहे. त्यांच्या मते गायींमध्ये साधनांचा वापर करण्याच्या बाबतीत नावीन्य दाखवण्याची क्षमता आहे, आणि आम्ही हजारो वर्षांपासून या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केले आहे. जगात सुमारे १.५ अब्ज गुरे आहेत आणि मानव त्यांच्यासोबत किमान १०,००० वर्षांपासून राहत आहे. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला आताच कळत आहे, हे धक्कादायक आहे ; असे युनिव्हर्सिटी ऑफ व्हेटर्नरी मेडिसिनमधील पोस्टडॉक्टरल संशोधक आणि या अभ्यासाचे प्रमुख लेखक अँटोनियो जे. ओसुना-मास्कारो यांनी सीएनएनला पाठवलेल्या ईमेलमध्ये लिहिले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @The Associated Press / @AP या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. पाठीला खास आलं की, आपण काठी, पेन्सिल, फणी किंवा अगदी इतर व्यक्तींची मदत घेतो. तसंच काहीसे वर्तन ही गाय करताना दिसली आहे; ज्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आहे.
