customer tipped delivery boy viral video : कामाची पोचपावती मिळणे काम करणाऱ्यासाठी खूप मोठी गोष्टी असते. आपण केलेल्या कामाची समोरच्याने दखल घेतली ही गोष्ट मनाला एक वेगळाच आनंद देऊन जाते. मग ही पोचपावती समोरची व्यक्ती एखादी ट्रॉफी, प्रमाणपत्र, पाठीवर दिलेली कौतुकाची थाप किंवा अगदी चार पैसे हातावर ठेवून का देईना. सोशल मीडियावर असेच काहीसे दाखवणारा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. केवळ १५ रुपयांच्या ऑर्डरवर एका ग्राहकाने ५०० रुपयांची ‘टिप’ (बक्षीस) दिल्याने ‘ब्लिंकिट’चा (Blinkit) एक डिलिव्हरी बॉय भारावून गेला.
डिलिव्हरी बॉयने ‘I’m BlinkIt Rider’ ने इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हे अकाउंट चालवणारी व्यक्ती ‘ब्लिंकिट’चा डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करतानाचे दैनंदिन कामातील विविध क्षण नियमितपणे रेकॉर्ड करून शेअर करत असतो. मिळालेल्या टिपबद्दल “ही केवळ १५ रुपयांची ऑर्डर होती. तुम्हाला माहीत आहे का त्या ‘दीदीने किती टिप दिली? त्यांनी मला चक्क ५०० रुपयांची टिप दिली. दीदी, तुमचे खूप खूप आभार. माझी सहसा इतकी कमाई दिवसालाही होत नाही” ; असे तो व्हिडीओत सांगतो.
वस्तू १५ रुपयांची असो किंवा ५०० रुपयांची, अनेकदा डिलिव्हरी बॉय घरापर्यंत ऑर्डर आणून देतो; पण आपण त्याला साधं पाणी देणं तर दूरच, “थँक यू” म्हणायलाही विसरतो. अशा वेळी एका महिलेने दाखवलेली संवेदनशीलता अनेकांच्या मनाला भिडली आहे. अवघ्या १५ रुपयांच्या वस्तूची डिलिव्हरी करण्यासाठी पावसाची तमा न बाळगता आलेल्या डिलिव्हरी बॉयचे तिने कौतुक केले. त्याच्या मेहनतीची दखल घेत टीप म्हणून तब्बल ५०० रुपये दिले. तिच्या या छोट्याशा कृतीमुळे सोशल मीडियावर तिचे भरभरून कौतुक होत आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
https://www.instagram.com/im_blinkit_rider/reel/DaK804UzhMq
व्हिडीओ पाहून अनेक युजर्सनी “दयाळूपणाची एक छोटीशी कृती एखाद्याच्या दिवसात किती अर्थपूर्ण बदल घडवू शकते”, “ज्या लोकांनी स्वतः आर्थिक अडचणी अनुभवल्या आहेत, त्यांना इतरांना मदत करण्याचे महत्त्व अनेकदा समजते”, “ग्राहकाला कदाचित हे नक्कीच माहीत असावे की, ही अनपेक्षित टिप डिलिव्हरी रायडरसाठी किती महत्त्वाची असते” तर काही जणांनी डिलिव्हरी बॉय आणि ग्राहक महिलेला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.
