Daughter Birth Viral Video: समाजात मुलगा-मुलगी यांच्यातील मानसिकता हळूहळू बदलताना दिसत आहे. कधी काळी मुलगा जन्माला आला की जल्लोष आणि मुलगी जन्माला आली की निराशा, असं दृश्य दिसायचं. मात्र आता काही घटना अशाही घडत आहेत, ज्यात मुलीच्या जन्मानंतर मोठा जल्लोष करतात अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. चार भावांच्या घरात पहिल्यांदाच मुलीचा जन्म झाला आणि या आनंदाचा उत्सव अक्षरशः मिरवणूक काढून साजरा करण्यात आला. हा व्हिडीओ पाहून काही जण भावूक झाले, तर काहींनी प्रश्नही उपस्थित केले.

हा व्हायरल व्हिडीओ बुंदेलखंडमधील हमीरपूर जिल्ह्यातील आहे. अंजुम परवेज या व्यक्तीच्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला. चार भाऊ असलेल्या या कुटुंबात आजपर्यंत एकही मुलगी नव्हती. त्यामुळे घरात मुलीच्या आगमनानं जणू घराला आनंदाचे भरते आले आणि तो आनंद त्यांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. या घटनेचाच व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच तो प्रचंड व्हायरल झाला.

व्हिडीओमध्ये तब्बल १३ स्कॉर्पिओ गाड्यांचा ताफा दिसतो. या सर्व गाड्या निळ्या रंगाच्या फुग्यांनी सजवलेल्या आहेत. रुग्णालयातून घराकडे निघालेला हा ताफा म्हणजे जणू एखाद्या लग्नाची मिरवणूक असल्याप्रमाणे भासत होता. डीजेचा आवाज, ढोल-ताशांचा गजर आणि नाचणारी माणसं यांमुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचं वातावरण निर्माण झालं होतं. लोक रस्त्यावर मुद्दाम थांबून ही मिरवणूक पाहत होते. मुलगी जन्माला आल्याचा आनंद इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा करणं अनेकांसाठी आश्चर्याचं आहे.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. काही लोकांनी या कुटुंबाचं कौतुक केलं. “मुलगी म्हणजे लक्ष्मी, असा सन्मान पाहून छान वाटलं,” अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या. काहींनी हा बदल सकारात्मक असल्याचं म्हटलं आणि समाज योग्य दिशेनं चालल्याचं मत प्रतिक्रियांमधून व्यक्त झालं.

मात्र, काही लोकांनी यावर टीकाही केली. “हा सगळं केवळ दिखावा आहे,” असं म्हणणारेही होते. एका युजरनं तर “फक्त वेगळं दिसण्यासाठी अशी मिरवणूक काढतात,” अशी प्रतिक्रियादेखील एकानं दिली. दुसरीकडे काही बुंदेलखंडवासीयांनी “आमच्या भागात आनंद असाच साजरा केला जातो,” असं म्हणत या कुटुंबाचं कौतुक केलं.

हा व्हिडीओ केवळ जल्लोषापुरता मर्यादित राहिलेला नाही; तर त्यातून समाजात मुलगा-मुलगी समानतेवरही चर्चा सुरू झाली आहे. हा खरोखरच मुलीच्या सन्मानाचा संदेश आहे की, फक्त सोशल मीडियासाठी केलेला दिखावा, यावर अनेकांनी मतं मांडली आहेत.