Mother And Daughter Viral Video : पहिल्या नोकरीतून जमा केलेल्या पैशातून किंवा पहिल्या पगारातून घरातील सदस्यांना एखादी भेटवस्तू देणे आपल्या प्रत्येकाच्या बकेट लिस्टमध्ये असते. त्यातून फक्त आनंद नाही तर कुटुंबातील सदस्यांनी आपल्यासाठी केलेल्या कष्ट व मेहनतीची परतफेड असते. त्यांना आपल्याबद्दल अभिमान वाटावा असाच त्यामागील उद्देश असतो. इन्स्टाग्रामवर व्हायरल होणारा व्हायरल व्हिडीओ नेमके हेच सिद्ध करत आहे.

जर्मनीमध्ये नोकरी करणारी वंशिका ही इन्स्टाग्राम युजर आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी तिच्या मायदेशी आली आहे. यादरम्यान व्हिडीओत ती तिच्या आईशी गप्पा मारताना दिसते आणि जर्मनीतून आईसाठी काहीही न आणल्याबद्दल गंमतीने माफी मागते. त्यावर तिची आई, “तर काय झाले” असे म्हणून विषय सोडून देते. पण, इथेच आईला आयुष्यातलं सगळ्यात मोठं सरप्राईज मिळणार असते. त्यानंतर लेक पाठीमागून भेटवस्तूचा बॉक्स बाहेर काढत “हे माझ्याकडून तुमच्यासाठी आहे” जेव्हा आई बॉक्स उघडते, तेव्हा त्यात दागिन्यांचा सेट असतो.

साठवलेल्या पैशातून घेतलेली पहिली गोष्ट (Viral Video )

तिच्या आईला विश्वासच बसत नाही. जणू काही काय घडले आहे हे तिला समजताच येत नाहीये. पण, त्या गोष्टीची पूर्ण जाणीव होण्याआधीच, लेक आणखीन एक सोन्याच्या दागिन्यांचा सेट बाहेर काढते. यावेळी मात्र आईला धक्काच असतो. या अनपेक्षित आनंदाने भारावून जाऊन आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळतात. यादरम्यान लेक तिच्या आईला मिठी मारून सावरते आणि वारंवार सांगते ‘रडू नकोस’ असे म्हणताना दिसते.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @vansshhiiikaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लेक वंशिकाने “परदेशात असताना साठवलेल्या पैशातून मी घेतलेल्या या पहिल्या गोष्टी होत्या. चार वर्षांपूर्वी, मी माझ्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी जर्मनीला गेले. कमाईतून माझ्या आईसाठी मला भेटवस्तू घ्यायची होती. आमच्या कुटुंबासाठी तिने केलेल्या प्रत्येक त्यागाबद्दल तिचे आभार मानण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता. ती जगातील सर्व आनंदास पात्र आहे आणि तिचे आयुष्य एखाद्या राणीसारखे सुखद करण्यातच मी माझे उर्वरित आयुष्य घालवेन. त्याचबरीबर जे कोणी कठोर परिश्रम करत आहेत, त्यांना मी सांगेन: प्रयत्न करत राहा. आपल्या पालकांना अभिमान वाटायला लावणे आणि त्यांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू पाहणे. या भावनेची बरोबरी जगात कशाशीही होऊ शकत नाही” ; असे लिहिले आहे.

नेटकरी देखील व्हिडीओ पाहून “हे पाहून मला रडूच आले. आपल्याकडे आज जे काही आहे, ते सर्व त्यांच्यामुळेच आहे”, “मी स्वतः हा क्षण अनुभवला आहे आणि ही भावना खरोखरच खूप सुखद असते”, “मलाही माझ्या आईबरोबर असे काहीतरी करण्याचे स्वप्न होते. आयुष्याची योजना काही वेगळीच होती. या पण, व्हिडीओने मला आठवण करून दिली की यासाठी कधीच उशीर झालेला नसतो” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत…