Delivery Boy Funny Video : रात्रीच्या अंधारात एकीकडे लोक गाढ झोपलेले असतात. पण काही लोकांना खाण्याची इतकी आवड असते की, ते रात्री अपरात्रीही काहीना काही ऑर्डर करुन खात असतात. खाण्याच्या नादात ते झोप विसरतात. यात फूड डिलिव्हरी ॲप्सवर काम करणारे हजारो डिलिव्हरी पार्टनर्स रात्रीच्या अंधारात या खवय्यांची खाण्याची इच्छा पूर्ण करतात. नुकताच अशाच एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, जो पाहून तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल. व्हिडीओत तो रात्रीच्या वेळी मुली काय ऑनलाईन ऑर्डर करत असतात याविषयी रंजकपणे सांगतोय.
व्हिडिओमध्ये डिलिव्हरी बॉय थेट कॅमेऱ्यासमोर सांगतो की, मध्यरात्री १ ते ३ च्या दरम्यान सर्वाधिक ऑर्डर्स या मुलींच्या असतात. तो पुढे म्हणतो, “ऑर्डर पिकअप केल्यावर त्या काय म्हणतात माहितीये? ‘भैय्या, आल्यावर फोन करा, बेल वाजवू नका!’ आणि ऑर्डरमध्ये काय असतं? चिप्स, वेफर्स… म्हणजे अगदी लहान मुलं खातात अशा गोष्टी. रात्रीच्या वेळी हे सगळं खाण्याची काय वेळ आहे भाऊ? आणि तेही बेल न वाजवता, अगदी चोरी-छुपे! असं वाटतं की, यांना दिवसभर हे सगळं खायला वेळच मिळत नाही.”
डिलीव्हरी बॉयचा हा मजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @the_deliveryboy81 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्यावर युजर्सही मजेशीर कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, “सॉरी भाऊ, रागवू नकोस!” दुसऱ्याने लिहिले, “थँक्यू भैय्या, हे गुपित सगळ्यांना सांगितल्याबद्दल.” तिसऱ्याने लिहिले की, “हा आमचा स्वतःचा हक्काचा वेळ असतो.”चौथ्या युजरने लिहिले, “हे जाणून आनंद झाला की, रात्रीच्या वेळी चिप्स खाण्याची इच्छा होणारा मी एकटाच नाहीये.”आणखी एकाने विचारले, “काय भैय्या, तुम्ही तर थेट पर्सनल होत आहात?”
डिलिव्हरी बॉयच्या आयुष्याची दुसरी बाजू
हा व्हिडिओ केवळ मनोरंजक नाही, तर डिलिव्हरी वर्करच्या खऱ्या आयुष्याची झलकही दाखवतो. रात्रीच्या शिफ्टमधील सुरक्षेची चिंता, थकवा, हवामानाचा मार आणि ग्राहकांच्या अतरंगी ऑर्डर्स त्यांच्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत. अनेक डिलिव्हरी पार्टनर्स सांगतात की, ‘मिडनाइट ऑर्डर्स’मुळे त्यांची कमाई तर वाढते, पण आरोग्य आणि झोपेचे खोबरे होते. कंपन्या रात्रीच्या वेळी अतिरिक्त इन्सेंटिव्ह (Incentive) देतात, तरीही कामाचे कष्ट कमी होत नाहीत.
डिजिटल युगातील ‘मिडनाइट स्नॅकिंग’, ‘इन्स्टंट क्रेव्हिंग्ज’ आणि ‘२४×७ सेवा’ या नवीन संस्कृतीवरही हा व्हिडिओ प्रकाश टाकतो. एकीकडे ग्राहक घरात बसून आरामात ऑर्डर करतात, तर दुसरीकडे डिलिव्हरी बॉईज पाऊस, थंडी, ऊन आणि अवेळी मेहनत करतात. शेवटी, या डिलिव्हरी बॉयची ही गोड आणि मजेशीर तक्रार आपल्याला आठवण करून देते की, आपल्याला मिळणाऱ्या प्रत्येक सुविधेमागे कोणाचे तरी अपार कष्ट दडलेले असतात.
