Viral Video Auto Driver Jugaad : बस, ट्रेन, मेट्रो असो किंवा अगदी रिक्षा उन्हाळ्यात कोणत्याही वाहनातून प्रवास करणे नकोसे वाटते. त्यामुळे काही रिक्षाचालक स्वतःप्रमाणेच प्रवाशांसाठीही वेगवेगळे जुगाड करून पाहत असतात. रिक्षाचा प्रवास आरामदायक वाटत नसल्यामुळे बहुधा कोणालाही आवडत नाही. पण, बंगळुरूमधील एका रिक्षाचालकाने आपल्या रिक्षामध्ये वेगवेगळ्या खास सोई आणि फीचर्स देऊन ही धारणा पूर्णपणे बदलून टाकली आहे. त्याने चालत्या-फिरत्या रिक्षात प्रवाशांना अशा काही सोई उपलब्ध करून दिल्यात की, प्रत्येकाला उन्हाळ्यातही या रिक्षातून जाण्याची इच्छा होईल.
इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या ‘पूर्णा’ने या खास पद्धतीने सजवलेल्या रिक्षाचा तिचा प्रवास दाखवला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं प्रेक्षकांना अशा एका रिक्षाची झलक दाखवली आहे, जे साधं प्रवासाचं वाहन न वाटता, एखादं छोटं फिरतं ‘आरामदायी लाऊंज’ असल्याचा भास व्हावा. या रिक्षाच्या चालकानं रिक्षामध्ये प्रवाशांना उन्हाळ्यात आराम मिळावा यासाठी अनेक विचारपूर्वक सुधारणा केल्याचे दिसत आहे. सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी पडदे, ज्यामुळे रिक्षा आणि रिक्षाची सीट गरम होणार नाही. एक लहान पंखा, जो प्रवाशांना वारा घालत राहील.
अनोखी रिक्षा (Viral Video )
रिक्षात मोबाईल चार्ज करण्यासाठी चार्जिंग पॉईंट, छोटासा टीव्ही, वाचण्यासाठी पुस्तके आणि यूपीएआय नाही फक्त कॅश घेणार आदी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे दिसत होते. त्याचबरोबर तो सामाजिक गोष्टींनाही समर्थन देत होता. त्यामुळे रिक्षाचालकानं फक्त साधं काम न करता, काहीतरी वेगळं आणि खास करण्याचा प्रयत्न केला होता. अनेक जण आकर्षकरीत्या रिक्षा सजवतात. चालत्या-फिरत्या रिक्षात गाणी, झाडं किंवा अगदी लायटिंग लावून प्रवास आणखीन खास करण्याचा प्रयत्न करत असतात. पण, या रिक्षाचालकानं प्रवाशांचा विचार करून, रिक्षात खास गोष्टींची सोय केल्यामुळे सगळेच त्याचे कौतुक करीत आहेत.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @poorna_101 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी व्हिडीओ पाहून रिक्षाचालकाच्या कल्पकतेची प्रशंसा केली. तर, काहींनी त्यावर विनोदही केले, “ग्रँड ऑटो”, “उन्हाळा आणि त्यात बंगळुरूमध्ये होणारी दररोजची वाहतूक कोंडी यादरम्यान प्रवाशांची काळजी घेण्यासाठी केलेल्या रिक्षाचालकाच्या या खास प्रयत्नाचे कौतुक केले आहे”, “बापरे! मला आठवलं. मी एकदा रिक्षामधून प्रवास करीत होते आणि त्यानं चक्क तेव्हा ‘टायटॅनिक’ सिनेमा लावला होता” आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्याचे दिसून आले आहे.
