Elderly Couple Viral Video : थरथरत्या हातांनी हात पकडून चालणाऱ्या वृद्ध जोडप्यांना पाहिलं की, आपलंही नातं इथपर्यंत टिकावं, कोणीतरी आपल्यावरही असंच जीवापाड प्रेम करावं अशी नकळत भावना प्रत्येकाच्या मनात येते. कारण – या बदलत्या काळात शेवटपर्यंत साथ देणारी व्यक्ती भेटणं म्हणजे एखाद्या लॉटरी पेक्षा कमी नसते. तर हीच लॉटरी सध्या व्हायरल व्हिडीओतील वृद्ध जोडप्याला लागली आहे असे म्हणायला हरकत नाही.

काळजी, प्रेम फक्त बोलून नाही तर कृतीतूनही व्यक्त करता येते. याच प्रात्यक्षिक एका रेस्टॉरंटमध्ये पाहायला मिळाले. वृद्ध नवरा स्वतःसाठी व बायकोसाठी जेवणाच्या दोन प्लेट्स घेऊन टेबलाकडे जाताना दिसतात; जिथे त्यांची बायको आधीच बसलेली असते. टेबलाजवळ पोहोचल्यावर, स्वतःच्या जागेवर बसण्यापूर्वी आधी बायकोसमोर प्लेट ठेवतात, स्वतः बसतात आणि मग दोघेही मिळून जेवणाचा आनंद घेतात.

हा क्षण पाहिल्यानंतर इन्स्टाग्राम युजर भारावून गेली आणि तिने “आज मी त्यांना पाहिलं आणि मन अगदी भरून आलं. काकांनी काकूंसाठी प्रेमाने त्या प्लेट्स उचलून नेण्याचा साधा पण खूप सुंदर क्षण पाहून मी भावूक झाले. का कोण जाणे, पण तो प्रसंग मनाला खूप स्पर्शून गेला. त्या क्षणी मनोमन अशी इच्छा केली की, भविष्यात माझं आणि माझ्या जोडीदाराचं नातंही असंच प्रेम, काळजी आणि जिव्हाळ्याने भरलेलं असावं” ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @shanaa_8297 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून
“खूपच छान, काकू आणि काका”, “दोघांना पाहून आनंदाश्रू आले. खरोखरच ‘कपल्स गोल्स’ काय असतं तुम्ही आज दाखवलं आहे”, “फॉरेव्हर (Forever) हा केवळ एक शब्द नसून एक वचन असते”, “एकाच व्यक्तीवर आयुष्यभर प्रेम करणं असंच काहीसं दिसतं”, “त्यांनी एकसारखे कपडे घातले आहेत” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत.