How many months does an elephant give birth : प्राणी आणि माणसं यांच्यातील बऱ्याच गोष्टी सारख्या असतात. फक्त आपण शहरात आणि ते जंगलात राहतात. मात्र, जगणे, उदरनिर्वाह, कुटुंबाचे रक्षण, मुलांचे संगोपन यांसाठी सगळ्यांना सारखेच कष्ट करावे लागतात. आई झाल्यावर स्त्रियांचा दुसरा जन्म होतो, असे म्हणतात. आपल्या पोटात एका बाळाला वाढवणे, त्याचा सांभाळ करणे वाटते तितके सोपे नसते. पण, प्राण्यांचं काय? त्या गर्भावस्थेत असताना त्यांच्या पोटात किती महिने ही पिल्ले असतात, त्या पिल्लाचं वजन काय असतं, त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का? नाही… मग ही बातमी अगदी शेवटपर्यंत वाचा…

उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाच्या घनदाट अरण्यात, वन अधिकाऱ्यांना असे एक दृश्य पाहायला मिळाले, जे पाहण्याचे भाग्य फारच कमी वन्यजीव तज्ज्ञांना लाभते. ते भाग्य म्हणजे आपल्या दोन जुळ्या पिल्लांसह जंगलातून वाट काढत जाणारी एक रानहत्तीण. ९ मे रोजी बिजरानी क्षेत्रातील ‘जादपहाड’ भागात वन अधिकाऱ्यांच्या ही हत्तीण आणि तिची नवजात जुळी पिल्ले दिसली. त्यानंतर काही दिवसांनीच म्हणजे १२ व १३ मे रोजी वन विभागाच्या पथकांनी या तिघांना पुन्हा ‘गर्जिया पर्यटन क्षेत्रात’ पाहिले आणि त्यांचा व्हिडीओ शूट करून घेतला.

हत्तिणींमध्ये जुळी पिल्लं जन्माला येण्याची बाब खूपच दुर्मीळ असते. १०० पैकी एकपेक्षाही कमी वेळा हत्तिणीला जुळी पिल्लं होतात. कारण- जन्मल्यावर एका हत्तीच्या पिल्लाचे वजन सुमारे ७० ते १२० किलो असते. मग तुम्ही विचार करा की, एकाच वेळी दोन पिल्लांना पोटात वाढवणे आणि त्यांना जन्माला घालणे हे त्या हत्तिणीसाठी शारीरिक आणि चयापचयाच्या (metabolic) दृष्टीने प्रचंड आव्हानात्मक प्रक्रिया असते. त्यांचा गर्भधारणेचा काळही प्राण्यांमध्ये सर्वांत जास्त मानला जातो, जो जवळपास २२ ते २४ महिन्यांचा असतो. त्यामुळे जुळी पिल्ले जन्माला येणे हत्तिणीसाठी किती मोठे आणि कठीण आव्हान आहे, हे सहज लक्षात येऊ शकते.

उत्क्रांतीशास्त्रज्ञांच्या भाषेत हत्ती ‘एक्स्ट्रीम K-स्टॅटेजी’ फॉलो करतात. म्हणजेच ते कमी पिल्लांना जन्म देतात; पण त्यांची खूप काळजी घेतात आणि त्यांना वाढवण्यासाठी जास्त वेळ व ऊर्जा खर्च करतात. जेव्हा एखादे हत्तीचे पिल्लू जन्माला येते. तेव्हा संपूर्ण कळप आई आणि नवजात पिल्लांचं संरक्षण करण्यासाठी एकत्र येतो. कारण- प्रत्येक जन्म हा त्यांच्यासाठी खूप मोठी आणि महत्त्वाची नैसर्गिक गुंतवणूक असते. जुळ्या पिल्लांच्या बाबतीत तर ही काळजी, संरक्षण आणि आव्हाने अनेक पटींनी वाढतात.

व्हिडीओ नक्की बघा…

हत्तिणींना फक्त दोन स्तनग्रंथी असतात. त्यातून तयार होणारे दूध चरबीयुक्त असते आणि ते एका पिल्लासाठी अगदी योग्य प्रमाणात असते. दोन पिल्लांमध्ये ते विभागल्यास, ते दोघांच्याही वाढीसाठी पुरेसे नसू शकते. मग जंगलात अशा वेळी कळपातील इतर दूध पाजणाऱ्या हत्तिणीही मदतीला पुढे येतात. त्या जुळ्या पिल्लांपैकी एखाद्या पिल्लाला स्वतःचे दूध पाजतात, ज्यामुळे त्या दोन्ही पिल्लांच्या जगण्याची शक्यता वाढते.

सोशल मीडियावर ही माहिती @Himanshutyg_ifs या आयएफएस अधिकाऱ्याने शेअर केली आहे. हत्ती आणि तिच्या जुळ्या पिल्लांचा व्हिडीओ पीटीआयच्या @PTI_News या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो पाहून अनेक जण आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत.