Emotional Video Mother Daughter: आपल्याला योग्य जोडीदार मिळावा आणि पुढील आयुष्य सुखकर व्हाव असं प्रत्येक मुलीला वाटत असतं. पण, त्या मुलीसाठी माहेर सोडून सासरी जाण्याची भावना जितकी आनंद देणारी असते तितकीच दुःखाचीही असते. कारण ती आपलं माहेर, आपल्या आठवणी सगळंच सोडून पुढील वाटचालीकडे निघालेली असते.

इतकी वर्ष आपल्या आई-वडिलांबरोबर राहिलेली लेक त्यांना सोडून जाण्याच्या विचाराने घाबरीघुबरी होते आणि तिची तळमळ फक्त तिला आणि त्या आईबापालाच कळत असते. लग्न झाल्यानंतर माहेरपणासाठी आलेल्या लेकीचे आई-वडिल खूप लाड करतात. तिला हवं नको ते विचारतात. थोडी का होईना त्या लेकीला माहेरी विश्रांती मिळते.

अशाच माय-लेकींचे अनेक भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे, जो पाहून तुमचेही डोळे पाणावतील.

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावरील हा व्हायरल व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये माहेरपणासाठी आलेल्या एका महिलेने तिच्या आईचा सुंदर असा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, लेकीने सासरी माहेराहून काहीतरी घेऊन जावं यासाठी आई अट्टहास करतेय. तिच्याजवळ असलेला मसाला ती लेकीला एका डब्यात भरून देतेय. अशाच प्रकारे, साखर, तांदूळ, गहू अशा अनेक गोष्टी ती लेकीसाठी पिशवीत भरून देताना दिसतेय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @aamhi_tighe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “माहेर किती ही गरीब असू दे पण जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आपली पिशवी कधीच रिकामी नाही पाठवणार” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १.२ मिलियन व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा आईचा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले. या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “खरं आहे आई आहे तोपर्यंतच माहेर असतं, आई नाही तर काही नाही.” तर दुसऱ्याने “आई ही आई असते तीची माया आभाळाएवढी असते” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “माझी सासू असं मला भरभरून देतं”, “हो आई आई आहे. तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही, ती आहे म्हणून माहेर आहे” अशीही कमेंट एकाने केली. तर एकजण म्हणाला, जिथे आई बाबा आहेत ते माहेर कधीच गरीब नसते. त्यांच्या प्रेमाची श्रीमंती असते.