आजच्या सोशल मीडियाच्या युगात कोणताही छोटासा क्षण कधी मोठी चर्चा बनून जाईल याबदल काही सांगता येत नाही. लग्न, साखरपुडा, वाढदिवस किंवा इतर कौटुंबिक कार्यक्रम हे आता फक्त घरापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर ते सोशल मीडियावर पोहोचून लाखो लोकांपर्यंत पोहोचतात. बदलत्या काळानुसार लोक कार्यक्रम साधे, मर्यादित आणि खासगी ठेवण्याचे बघतात. कमी पाहुणे, जवळची माणसं हाच आजचा ट्रेंड मानला जातो. मात्र काही वेळा परंपरा, सामाजिक नाती आणि गावकीचं बंधन इतकं मजबूत असतं की अशा सर्व आधुनिक संकल्पनांना मागे टाकून वेगळी दृश्यं समोर येतात. असाच एक क्षण सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे आणि पाहणाऱ्यांना अक्षरशः थक्क करत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये एका साखरपुड्याचा कार्यक्रम दाखवण्यात आला आहे, जो नेहमीच्या साखरपुड्यांपेक्षा पूर्ण वेगळा आहे. त्यामध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी अक्षरशः शेकडो लोक एकाच वेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाताना दिसतात. ही दृश्यं पाहून अनेकांना जणू एखादी निवडणूक रॅली किंवा मोठा सार्वजनिक कार्यक्रम सुरू असल्याचा भास होतो. एवढ्या मोठ्या संख्येने आलेले पाहुणे पाहून हा साखरपुडा नसून लग्नाचाच कार्यक्रम असल्यासारखं वाटतं.
त्यानंतरच्या दृश्यांमध्ये नवरदेवाकडच्यांचे नवरीकडचे मोठ्या उत्साहात स्वागत करतात. लोक एकमेकांना मिठी मारत, आनंद व्यक्त करत, जेवणाचा आस्वाद घेताना दिसतात. नवरदेव नवरी एकमेकांसोबत फोटो काढताना, पारंपरिक विधी पार पाडताना आणि साखरपुड्याचा आनंद घेताना दिसतात. संपूर्ण वातावरणात आनंद, उत्साह आणि गावकीचा अभिमान स्पष्टपणे जाणवतो.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील abhaybanote_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून तो प्रचंड व्हायरल झाला असून, आतापर्यंत तब्बल ३४ लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. तसेच एक लाखांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. प्रतिक्रियांमध्ये युजर्सनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या जोडप्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले, तर अनेकजण पाहुण्यांच्या संख्येवर चकित झाले.
एका युजरने लिहिलं, “बाप रे! साखरपुड्यात इतके लोक मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहतोय.” दुसऱ्या युजरने म्हटलं, “हा साखरपुडा नसून महोत्सव वाटतोय, पण पाहून खूप छान वाटलं;” तर तिसऱ्या युजरने गमतीत लिहिलं, “साखरपुड्याला इतकी गर्दी आहे, तर लग्नात पूर्ण जिल्हा येणार वाटतं.” काही युजर्सनी या घटनेतून कुटुंबाची लोकांमधील आपुलकी दिसून येते असं म्हटलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, लोकांना आश्चर्यचकित करत आहे.

