hindu men beating another man fact check : लाइटहाऊस जर्नालिझमच्या (Lighthouse Journalism) निदर्शनास आले की, एका व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला हात बांधलेल्या एका व्यक्तीला दोन जण लाठ्यांनी मारहाण करत आहेत. या व्हिडीओबाबत असा दावा केला जात होता की, हिंदूंनी एका तरुण मुस्लीम व्यक्तीला मारहाण केली आणि हा व्हिडीओ भारतातील आहे. पण, तपासादरम्यान आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ भारताचा नसून बांगलादेशचा आहे आणि तो दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केला जात आहे.
या दाव्याचे फॅक्ट चेक करणे आवश्यक होते. कारण – या व्हिडीओला भारतामधील अलीकडील घटना म्हणून आणि हिंदूंनी एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण केल्याचा दावा करून त्याला जातीय दृष्टिकोन दिला जात आहे; तर अशा दिशाभूल करणाऱ्या दाव्यांमुळे एखाद्या घटनेचे ठिकाण आणि परिस्थितीबद्दल संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि जातीय तणाव वाढू शकतो.
काय होत आहे व्हायरल?
एक्स (ट्विटर) युजर @TapasyaYaa83081 यांनी हा व्हायरल व्हिडीओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केला आहे. तसेच ‘भारतात हिंदूंनी एका तरुण मुस्लीम पुरुषाला मारहाण केली. त्याची आई रडत विनवणी करत होती, ‘त्याला मारू नका, माझा मुलगा मरेल’; मात्र तिचे कोणीही ऐकले नाही. त्यांनी काठ्या आणि दांडक्यांनी त्याला मारहाण सुरूच ठेवली’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे.
इतर युजर्सदेखील अशाच दाव्यासह हा व्हिडीओ शेअर करत आहेत.
https://www.instagram.com/reels/DcTe9JETJzg
तपास
आम्ही हा व्हिडीओ InVID (इन्व्हिड) टूलवर अपलोड करून तपासाला सुरुवात केली. या टूलच्या मदतीने व्हिडीओमधून काही कीफ्रेम्स (Keyframes) मिळवण्यात आले. त्यानंतर या कीफ्रेम्सचा रिव्हर्स इमेज सर्च करण्यात आला. या शोधातून आम्ही जुलै महिन्यात फेसबुकवर अपलोड करण्यात आलेल्या एका व्हिडीओपर्यंत पोहोचलो.
व्हिडीओला बंगाली भाषेत कॅप्शन देण्यात आले होते, “জুলুমের চুড়ান্ত মহড়া চলছে আমাদের নতুন মবল্যান্ডে।”
याचा अर्थ आहे: “आमच्या नव्या मोब लँडमध्ये अत्याचाराची अंतिम रंगीत तालीम सुरू आहे.”
याच व्हिडीओला आणखी एका फेसबुक युजरने जुलै महिन्यात आपल्या अकाउंटवरून शेअर केले होते.
कॅप्शनमध्ये म्हटले होते: স্বাগতম নতুন বাংলাদেশ।
याचा अर्थ आहे: नवीन बांगलादेशात तुमचे स्वागत आहे.
दोन्ही फेसबुक वापरकर्ते बांगलादेशमधीलच होते.
आम्ही पार्श्वभूमीवरील मजकूरदेखील तपासला, त्यासाठी आम्ही इमेज क्रॉप केली आणि ती गूगल जेमिनी (Google Gemini) वर अपलोड केली. बंगालीमध्ये त्यात म्हटले होते की, गुलशन अकॅडमी स्कूल अँड कॉलेज (গুলশান একাডেমি স্কুল এন্ড কলেজ ).

त्यानंतर आम्ही मिळालेल्या भाषांतरावरून कीवर्ड सर्च केला. यामुळे आम्हाला डढका येथील गुलशन अकॅडमी ऑफ स्कूल अँड कॉलेजच्या फेसबुक पेजवर पोहोचता आले.
https://www.facebook.com/gulshanAcademySchool
त्यानंतर आम्ही व्हिडीओचे काळजीपूर्वक निरीक्षण केले आणि लोकांच्या मागे असलेल्या भिंतीवर एक संपर्क क्रमांक लिहिलेला असल्याचे आम्हाला आढळले. संपर्क क्रमांक थोडा अस्पष्ट होता, तरीही त्याची खालीलप्रमाणे ओळख पटू शकली: ०१७५५-७५९३९६.
बांगलादेशमध्ये 017 ने सुरू होणारा फोन नंबर देशातील सर्वांत मोठा मोबाईल नेटवर्क ऑपरेटर असलेल्या ग्रामीण फोनचा (Grameenphone) आहे.
संपर्काच्या तपशिलांच्या खाली पार्श्वभूमीत असलेला मजकूरही आम्ही ओळखला. गूगल जेमिनीच्या मदतीने या मजकुराचे इंग्रजीत भाषांतर केले असता, त्यात “हाफिझिया मदरसा, निवासी / अनिवासी / डे केअर” असा उल्लेख असल्याचे आढळले. त्यानंतर आम्हाला फेसबुकवर एक पोस्ट आढळली, ज्यामध्ये हे ठिकाण बांगलादेशमध्ये असल्याचे नमूद करण्यात आले होते.
https://www.facebook.com/groups/bhadeswar/posts/1779932528703788
निष्कर्ष
बांगलादेशमधील जुना आणि असंबंधित व्हिडीओ भारतातील अलीकडील घटना म्हणून चुकीच्या दाव्यासह शेअर केला जात आहे. या व्हिडीओमध्ये हिंदू पुरुषांनी मुस्लीम पुरुषाला मारहाण केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, हा दावा दिशाभूल करणारा आहे.
