family celebrate parents 25th anniversary on Boat viral video : लग्नाचा २५ वा वाढदिवस म्हणजे कोणत्याही जोडप्यासाठी आयुष्यातील एक अतिशय खास टप्पा असतो. या २५ वर्षांच्या काळात त्यांनी अनेक सुख-दुःखाचे क्षण एकत्र अनुभवलेले असतात. कधी भांडणं, कधी एकमेकांना समजून घेतलं, तर कधी न विसरता येणाऱ्या वाईट गोष्टींनाही तोंड दिले. या सगळ्यांनी त्यांचा संसार अधिक मजबूत झालेला असतो. त्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये या खास प्रसंगानिमित्त जोडप्याचं पुन्हा एकदा लग्न लावण्याची परंपरा पाहायला मिळते. यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि नात्यातील प्रेम पुन्हा नव्याने फुलते. तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
एखाद्या सुंदर सिनेमातील दृश्याप्रमाणे आई-बाबांचा २५ वा लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. पाण्यात तरंगणाऱ्या बोटीत आई-बाबांचं पुन्हा एकदा लग्न लावण्यात आले आहे. मुंडावळ्या बांधून दोघेही आनंदाने उभे होते. तर मुलांनी प्रेमाने अंतरपाट धरला होता. फुलांच्या वर्षावात आणि आनंदाच्या वातावरणात हा लग्नसोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. त्यानंतर आई-बाबांनी एकमेकांना हार घातले आणि प्रेमाने एकमेकांना केक भरवत या खास क्षणाचा आनंद साजरा केला.
पुढचे प्रत्येक जन्म मी तुम्हालाच आई-बाबा म्हणून निवडेन… (Viral Video)
हा खास व्हिडीओ शेअर करत लेकीने @rohiiiii_52 “माझ्या आई-बाबांना लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्यासारखी मनाने इतकी सुंदर माणसं मी आजपर्यंत पाहिली नाहीत. जग कितीही कठोर असलं तरी चांगुलपणा कसा जपायचा, मनापासून कसं जगायचं, प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ कसं राहायचं हे तुम्ही आम्हाला शिकवलं. लोक तुमच्यावर प्रेम का करतात हे मला आता कळू लागलं आहे. कारण तुमच्याकडे पैशांपेक्षा खूप मौल्यवान अशी सुंदर मनं आहेत.
तुम्ही नेहमी इतरांचं भलं करता, कोणतीही अपेक्षा न ठेवता सगळ्यांना प्रेम देता. तुम्हाला मिळणारा आदर हा तुमच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि सगळ्यांशी नम्रतेने वागण्यामुळे आहे. इतर मंडळी तुमच्याबरोबर चांगलं वागत नसलं तरीही तुम्ही इतके शांत, प्रेमळ आणि दयाळू कसे राहता हे मला अजूनही आश्चर्य वाटतं. हाच तुमचा खरा मोठेपणा आहे. मला तुमचं लेकरू असल्याचा खूप अभिमान आहे. मला पुन्हा जन्म मिळाला तरी मी प्रत्येक वेळी तुम्हालाच माझे आई-बाबा म्हणून निवडेन. देवाने तुम्हाला नेहमी निरोगी, आनंदी आणि दीर्घायुषी ठेवो हीच प्रार्थना” ; अशी सुंदर कॅप्शन लिहिली आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @rohiiiii_52 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत आणि लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाच्या या खास व्हिडीओला वेगवेगळ्या शब्दांत शुभेच्छा देत व्यक्त होताना दिसत आहेत…
