Family Leave Elderly Woman On Bus Strop viral video: आजच्या सोशल मीडियाच्या काळात एखादा छोटा व्हिडीओही मोठी चर्चा निर्माण करू शकतो. विशेष म्हणजे कुटुंब, नाती आणि वृद्धांची काळजी यांसारख्या विषयांशी संबंधित व्हिडीओ लोकांच्या मनाला लागतात. अलीकडे वृद्ध व्यक्तींना दुर्लक्षित केल्याच्या घटना समोर येत असल्यामुळे याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि कुटुंबातील मतभेद यामुळे अशा गोष्टी वाढत असल्याचे बोलले जाते. सोशल मीडियावर असे व्हिडीओ व्हायरल झाले की, लोक फक्त त्या घटनेबद्दलच नाही, तर समाजात काय बदल होत आहेत यावरही विचार करू लागतात.

मध्य प्रदेशातील मंदसौर येथील बस स्टँडवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सुमारे ८० वर्षांची एक वृद्ध महिला बस स्टँडवर एकटी बसून रडताना दिसत आहे. तिच्या जवळ काही सामान असून ती स्पष्टपणे अस्वस्थ आणि घाबरलेली दिसते.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, कुटुंबातील वादानंतर या महिलेला तिच्याच कुटुंबीयांनी बस स्टँडवर सोडून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्हिडीओ शूट करणारा व्यक्ती तिला एका शिक्षकाची आई असल्याचे सांगताना दिसतो आणि तिच्यासोबत वाईट वागणूक झाल्याचा दावा करतो. तो असेही म्हणतो की, महिला आपल्या मुलीकडे जाण्यासाठी निघाली आहे. पण, या व्हिडीओतील दाव्यांची खरी माहिती मिळाली नसल्याचेही सांगितले जात आहे. तरीही व्हिडीओमध्ये दिसणारी आजीची अवस्था पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी वृद्ध पालकांची अशी अवस्था करणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले, तर काहींनी अशा प्रकरणांमध्ये प्रशासनाने हस्तक्षेप करून योग्य कारवाई करावी, अशी मागणी केली. काही युजर्सनी बदलत्या सामाजिक परिस्थितीत वृद्धांची सुरक्षितता आणि सन्मान याबाबत गंभीर चर्चा सुरू होण्याची गरज असल्याचे नमूद केले.

अनेकांनी आपल्या पालकांप्रती जबाबदारीची जाणीव ठेवण्याचे सांगितले , तर काहींनी अशा घटनांमुळे कुटुंबव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया दिली. या घटनेकडे केवळ एक व्हिडीओ म्हणून नव्हे, तर समाजाने वृद्धांच्या प्रश्नांकडे अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.