Viral Video Family Welcome Baby Girl With Decorated Car : एकेकाळी मुलगी जन्माला आली की, दुःख व्यक्त केलं जायचं. मुलगा-मुलगीत भेद भाव केला जायचा. शिक्षण वगैरे मुलींना दिलं जायचं. पण घरातली वागणूक मात्र अगदी विचित्र असायची. तुला नोकरीची काय गरज तू तर लग्न होऊन जाणार, मुलांशी बोलू नकोस, सात नंतर घराबाहेर राहू नकोस अशी बरीच बंधने तिच्यावर लावली जायची. त्यामुळे पूर्वी काही जण मुलगी झाल्यावर नाक मुरडयाचे. पण, आता काळ बदलला आहे. अनेक जण मुलगी झाल्यावर आनंदाने नाचताना दिसतात. तर आज अशाच एका कुटुंबाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

एका कुटुंबात नवजात कन्येचे स्वागत झाले. पण, हे स्वागत करण्यासाठी तिच्या वडिलांनी अनोखी पद्धत निवडली आहे. देहरादूनमधील एका कुटुंबाने मुलगी जन्माला आल्याची बातमी साध्या पद्धतीने न सांगता खास आणि लक्षात राहील अशा पद्धतीने सांगण्याचे ठरवले. त्यांनी एक कार गुलाबी फुग्यांनी सजवली आणि त्या कारवर मागे मोठ्या अक्षरात “मुलगी जन्माला आली आहे” (A daughter is born) असे बॅनरवर लिहिले होते. त्यामुळे ही कार रस्त्यावर फिरवत त्यांनी आनंद साजरा केला.

मुलगी जन्माला येणं चमत्कारांपैकी एक असतं (Viral Video)

जेव्हा ती गाडी रस्त्यावरून जात होती, तेव्हा आजूबाजूचे लोक आश्चर्याने थांबले तर काही कौतुकाने पाहू लागले. अनेकांनी हसत प्रतिसाद दिला, हात हलवून शुभेच्छा दिल्या आणि आपल्या मोबाईलवर व्हिडीओही शूट केला. या प्रसंगाचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यात कोणताही दिखावा नव्हता, तर भावनांना महत्त्व होतं. मुलगी जन्माला आल्याचा आनंद त्यांनी मनापासून आणि खुलेपणाने इतरांबरोबर शेअर केला आहे. त्याचबरोबर घरी पोहचताच कुटुंबातील इतर सदस्यांनी लेक आणि आई-बाबांचे औक्षण करून, तिच्या पायाचे ठसे दरवाजाच्या भिंतीला उमटवून घेतले. अगदी शेवटी तिच्या चिमुकल्या पायांचा बाबांनी आशीर्वाद देखील घेतला.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @rjneeraj आणि @_anandikshaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी अभिनंदन करत “खरंच खूप छान वाटतं की, आता काही जण मुलगी (बेटी) जन्माला येणं शाप समजत नाहीत”, “जिथे काही लोक मुलगी झाल्यावर शांत राहतात, तिथे या कुटुंबाने मात्र सगळ्या जगाला अभिमानाने सांगितलं”, “नशिबवान लोकांच्या घरी मुलगी जन्माला येते”; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.