viral video first baby girl in 52 years : समाजात आजही मुलगा-मुलगी यांवरून होणारा भेदभाव पूर्णपणे संपलेला नाही. तुम्ही पाहिले असेल की, अनेक कुटुंबांमध्ये फक्त मुली असल्यास पालकांना “मुलगा नाही, मग घराचा वारसा कोण चालवणार?” किंवा “तुम्हाला एक तरी मुलगा असायला हवा होता,” अशा टिप्पण्यांना सामोरे जावे लागते. मात्र, याउलट काही कुटुंबे अशीही आहेत, जी वर्षानुवर्षे घरात एका मुलीच्या जन्माची आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

इंदूरमधील एका कुटुंबात तब्बल ५३ वर्षांनंतर पहिल्यांदाच मुलीचा जन्म झाला. हा क्षण इंदूरमधील प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर बेला शाह जैन यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओत ऑपरेशन थिएटरबाहेर ‘गुड न्यूज’ची वाट पाहणाऱ्या कुटुंबाची प्रतिक्रिया टिपली आहे. नातेवाईक हात जोडून, ​​प्रार्थना करीत, चिंतेत वाट पाहत उभे असल्याचे दिसत आहे. अखेर प्रतीक्षा संपते आणि डॉक्टर नवजात बाळाला घेऊन बाहेर येतात. जन्मलेले मूल मुलगी असल्याचे समजताच कुटुंब आनंदाने ओरडू व टाळ्या वाजवू लागते.

भावनेच्या भरात, अनेक सदस्य डॉक्टरांना, नंतर एकमेकांना मिठी मारताना आणि प्रत्येकाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरंगताना दिसतात. एकूणच नवजात बाळाप्रति कुटुंबातील सदस्यांचे हे प्रेम पाहून डॉक्टरांनी हा व्हिडीओ पोस्ट करून “कधी कधी चमत्कार घडण्यासाठी अनेक पिढ्यांची वाट पाहावी लागते. तब्बल ५२ वर्षं या कुटुंबात केवळ मुलांचाच जन्म होत होता. अखेर आता त्यांच्या घरी एका गोंडस मुलीचं आगमन झाले आहे,” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली. एकदा तुम्हीसुद्धा बघा हा प्रेमळ व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @the_gynaexpert या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “जेव्हा एखादं कुटुंब मुलाप्रमाणेच मुलीच्या आगमनाचीही तितक्याच उत्साहानं वाट पाहतं, तेव्हा मला खूप आनंद होतो आणि मन भरून येतं”, “माझ्या कुटुंबातही चार पिढ्यांत जन्मलेली मी पहिलीच मुलगी होते आणि आजही माझ्या कुटुंबात दुसरी कोणतीही मुलगी जन्माला आलेली नाही”; तर मुलींच्या जन्माबाबत बदलत चाललेल्या दृष्टिकोनाचेही कमेंट्सद्वारे कौतुक करण्यात आले आहे