father cry on naming ceremony viral video : वयाच्या कुठल्याही टप्यावर आपल्या लेकरांच्या पाठीशी ताकदीनं उभा असतो तो ‘बापमाणूस’ असतो. तो दाखवत नसला तरीही त्याचा लेकरांवर थोडा जास्तच जीव असतो. त्याचं मुलांवरचं प्रेम म्हणजे शब्दांत मांडता न येणारी एक कविताच असते. बायकोसमोर रागीट असणारा नवरा; मुलांसमोर मात्र बाबा म्हणून नेहमी झुकताना दिसतो. त्यामुळे लेकरांसाठी त्यांचा बाबा नेहमी हीरोसमान असतो, त्यामुळे जेव्हा पहिलं मूल जन्माला येतं तेव्हा सगळ्यात जास्त आनंद बापालाच झालेला असतो. तर आज सोशल मीडियावरदेखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

बाळ जन्मल्यानंतर त्याचं नाव ठेवण्याचा सोहळा अगदी थाटामाटात पार केला जातो. व्हायरल व्हिडीओतसुद्धा नुकत्याच जन्मलेल्या बाळाचं बारसं करण्यात आलं. कुटुंबानं त्या जन्मलेल्या बाळाचं अगदी खास गाणं लावून, सुंदररीत्या डान्स करीत स्वागतसुद्धा केलं. पण, यादरम्यान बाबांना मात्र रडू कोसळले, त्यांनी डोळ्यांतून येणाऱ्या अश्रूंना थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना प्रचंड रडू कोसळले आणि ते रडत मागे जाणार इतक्यात बाबांच्या मित्राने की भावाने त्यांना धीर दिला.

या क्षणासाठी खूप दिवस वाट पाहिली (Viral Video)

मित्राने की भावाने बाबांना पकडून बाळ आणि आईच्या शेजारी उभं केलं आणि त्यांचे डोळे पुसले. त्यामुळे हा खास क्षण पाहून बाबा या क्षणाची किती दिवसांपासून वाट बघत असतील याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. आईच्या नात्याला इतकं महत्त्व प्राप्त झालंय की, त्यामुळे अनेकदा बाप हा दुर्लक्षितच राहतो. बापाच्या भावनिकतेचं चित्रण अशा या छोट्या छोट्या क्षणांमधून होतं. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बाबांचा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @krishi.nagda या इस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी “असा सुंदर भाऊ / मित्र असणं ही खूप मोठी देणगी असते. तो तुमच्या प्रत्येक भावनेची काळजी घेतो. तू दुःखी असशील, रडत असशील किंवा भावना लपवून दूर जायचा प्रयत्न करत असशील तरी तो तुझ्या जवळ येतो, तुला समजून घेतो आणि तुझे अश्रू पुसतो”, “अश्रू सांगतायत बाबा या क्षणासाठी खूप दिवसांपासून वाट पाहत होता”, “काही क्षण असे असतात, जे फक्त वडीलच मनापासून अनुभवू शकतात” आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्याचे दिसून आले आहे.