Viral Video father reading son’s offer letter : शिक्षण झाल्यानंतर वेध लागतात ते नव्या नोकरीचे. त्यानंतर खूप ठिकाणी रेझ्युमे पाठवून अनेक कंपन्यांमध्ये इंटरव्युव्ह द्यावे लागतात. जॉब इंटरव्युव्हमध्ये जेव्हा आपली निवड होते आणि मग त्यानंतर कुठे जाऊन तो जॉब नशिबात येतो. मग नोकरीचे ऑफर लेटर हातात येते तेव्हा कुटुंबाने शिक्षणासाठी घेतलेले कष्ट, आपण नोकरी मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न अगदी डोळ्यासमोर येतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, यामध्ये बाबांची ऑफर लेटर वाचतानाचा क्षण लेकाने अगदी कौतुकाने शेअर केला आहे.
इन्स्टाग्राम युजरचा जन्म शेतकरी कुटुंबा झाला. जिथे चांगल्या शिक्षणाच्या सुविधा फारच कमी होत्या. पण, तरीही कष्ट करून, मन लावून शिक्षण घेऊन घरात इंजिनिअर होणारा तो पहिला मुलगा ठरला. त्याच्या वडिलांनी शिक्षणासाठी खूप कष्ट घेतले. त्यांनी लेकराच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी आणि भविष्यात नोकरीसाठी चांगली संधी मिळावी म्हणून वेगवेगळ्या प्रायव्हेट नोकऱ्या केल्या, वाटेला येणाऱ्या अनेक अडचणी सहन केल्या. त्यामुळे इन्स्टाग्राम युजरनेही मन लावून अभ्यास केला.
जेव्हा बाबा ऑफर लेटर हातात घेतात (Viral Video)
शेवटी अनेक वर्षानंतर त्याला Amazon मध्ये SDE-2 ची नोकरी मिळाली. मग तो नोकरीचे ऑफर लेटर कुटुंबाला दाखवण्यासाठी बंगळुरूहून दिल्लीला खास सरप्राईज देण्यासाठी आला. त्याने बाबांच्या हातात पहिल्या नोकरीचे ऑफर लेटर दिले आणि ते अगदी प्रत्येक ओळीवर बोटं ठेवून मनापासून वाचताना दिसले. त्यांची रिअॅक्शन अगदी खरी आणि मनापासून होती. त्यांच्यासाठी तो अभिमानाचा क्षण होता आणि युजरसाठी वडिलांच्या सगळ्या कष्टांची परतफेड केल्याचे समाधान होते.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @thessyadav_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये युजरने त्याच्या आयुष्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून ‘अशी स्टोरी पाहिली की आपोआप डोळ्यात पाणी येतं आणि चेहऱ्यावर हसूही येतं’, ‘माझंसुद्धा हेच एक स्वप्न आहे. बाबा खरंच देवासारखेच असतात’, ‘हे बघून मला माझ्या बाबांची आठवण आली’ ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत…
