Nature Shocking Video: हिमाचल प्रदेशातील कांग्रा जिल्ह्यात घडलेली एक विचित्र आणि अंगावर काटा आणणारी घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. एका मंदिराजवळ दिसलेला रहस्यमय आकार पाहून सुरुवातीला स्थानिकांनाही काहीच संशय आला नाही. मात्र, काही क्षणांतच जे उघड झाले, त्याने उपस्थितांच्या अंगावर शहारे आले.
गहलियान परिसरातील कालोथरे वाली माता मंदिराजवळ काही ग्रामस्थ फिरत असताना त्यांच्या नजरेस जमिनीवर पडलेला एक मोठा गुंता दिसला. दुरून पाहिल्यास तो अगदी झाडाच्या मुळांचा ढीग असल्यासारखा वाटत होता. त्यामुळे सुरुवातीला कोणीही त्याकडे विशेष लक्ष दिले नाही; पण एका व्यक्तीने उत्सुकतेपोटी त्या दिशेने दगड फेकला… आणि पुढच्याच क्षणी तो ‘निर्जीव’ वाटणारा गुंता अचानक हलू लागला.
क्षणातच सगळ्यांच्या लक्षात आले की, तो काही साधा ढीग नसून काहीतरी जिवंत आहे. जवळ जाऊन पाहिले असता, ते दृश्य पाहून उपस्थित लोक अक्षरशः थरारले. त्या ठिकाणी तब्बल पाच ते सहा प्रचंड आकाराचे अजगर एकमेकांत गुंतलेले होते. त्यांच्या शरीराची हालचाल आणि वळणं पाहून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
ही घटना पाहताच काही लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये त्याचा व्हिडीओ टिपला. काही वेळातच तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि देशभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात अजगर एकत्र दिसणे ही अत्यंत दुर्मीळ घटना मानली जाते.
थोड्याच वेळात ते सर्व अजगर वेगाने पांगले आणि जंगलाच्या दिशेने निघून गेले. मात्र, या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. विशेषतः मंदिराजवळ आणि जंगलाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये चिंता वाढली आहे.
या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून, अधिकाऱ्यांनी परिसरावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, अजगर हे सामान्यतः माणसांवर हल्ला करणारे नसतात. ते शक्यतो मानवांपासून दूर राहणे पसंत करतात. मात्र, जर त्यांना छेडले किंवा धोका वाटला, तर ते आक्रमक होऊ शकतात.
अजगर हे जगातील सर्वांत मोठ्या आणि बलवान सापांपैकी एक मानले जातात. ते विषारी नसले तरी त्यांच्या पकडीची ताकद जबरदस्त असते. शिकार पकडल्यानंतर ते आपल्या शरीराने तिला घट्ट वेढा घालून श्वास रोखतात. त्यांच्या आहारात प्रामुख्याने छोटे प्राणी, पक्षी आणि कधी कधी मोठे प्राणीही येतात.
तज्ज्ञ सांगतात की, अजगर पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते उंदीर आणि इतर लहान प्राण्यांची संख्या नियंत्रित ठेवून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतात.
तथापि, कांग्र्यात घडलेल्या या घटनेने एक गोष्ट स्पष्ट केली आहे निसर्ग कधी, कुठे आणि कोणत्या रूपात आपल्यासमोर येईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे अशा वेळी घाबरून न जाता, सतर्क राहणे आणि वन विभागाला तत्काळ माहिती देणे हेच सर्वांत सुरक्षित पाऊल ठरते.
येथे पाहा व्हिडीओ
(टीप : या बातमीत दिलेली माहिती सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. आम्ही या माहितीतील कोणत्याही दाव्याची पुष्टी करत नाही.)
