Pakistan Fruit Market Viral Video: ४०० रुपयांची पपई, ४५० रुपयांची केळी आणि तब्बल १२०० रुपयांचे खजूर! स्तिमित करणारे हे आकडे वाचून या खरोखरच फळांच्या किमती आहेत की एखाद्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील आलिशान शोरूममधील दरसूची, असा प्रश्न निर्माण झाला ना… तर, पाकिस्तानमधील एका फळांच्या मंडईत चित्रित झालेल्या व्हिडीओने सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडवली आहे. कदाचित त्या फळांचा गोडवा खूप चांगला असेलही; पण त्याच्या किमती ऐकूनच अनेकांचे भान हरपल्याचे दिसते.

गजबजलेली मंडई, रंगीबेरंगी फळांचे ढीग, विक्रेत्यांची हसरी मुद्रा आणि कॅमेऱ्यासमोर उभा असलेला भारतीय व्लॉगर-सगळे काही नेहमीसारखेच. भारतीय व्लॉगर Rizwan Sidra यांनी केवळ सहजच दुकानदाराला विचारले, “केळ्यांचा भाव किती” प्रश्न साधा होता; पण उत्तराने कुजबुज सुरू झाली. दुकानदाराने शांतपणे सांगितले-२५० ते ४५० पाकिस्तानी रुपये किलो. व्लॉगरच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि प्रेक्षकांच्या भुवयाही उंचावल्या.

पुढचा प्रश्न होता पपईच्या दराविषयीचा. त्यावर “४०० रुपये किलो,” असे उत्तर मिळताच काही क्षण कॅमेऱ्यासमोर शांतता पसरली. मंडईतील गडबड जणू थोडी थांबलीच. माल्टा (संत्र्याचा प्रकार) २५० ते ४५० रुपये किलो दराने विकली जात असल्याचे सांगितले गेले. दराचे एकामागोमाग एक आकडे ऐकताना महागाईची तीव्रता स्पष्टपणे जाणवत होती.

मात्र, खरी धक्का देणारी वेळ आली ती खजुरांचा भाव विचारल्यानंतर. दुकानदाराने दिलेले उत्तर ऐकून व्लॉगरही चकित झाले-तब्बल १२०० पाकिस्तानी रुपये किलो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने प्रसारित होत आहे. तो Instagram वरील ‘rizwansidravlog’ या खात्यावरून शेअर करण्यात आला असून, त्यावर हजारो प्रतिक्रिया उमटत आहेत.

या किमती पाकिस्तानी चलनातील असल्या तरी त्या सामान्य नागरिकांसाठी किती परवडणाऱ्या असतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आधीच आर्थिक अडचणी, वाढती चलनवाढ आणि दैनंदिन खर्चाचा वाढता ताण यांमुळे पाकिस्तानी नागरिक हैराण झाले आहेत, अशी चर्चा रंगत आहे. फळांसारख्या आरोग्यदायी अन्नपदार्थांच्या दरात इतकी वाढ झाल्यास सामान्य माणसाने काय करावे, असा सवाल नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

व्हिडीओमध्ये प्रत्येक फळाचा भाव ऐकताना प्रेक्षकांची उत्सुकता वाढत जाते. एकामागोमाग एक दर जाहीर होत असताना शेवटचा प्रश्न विचारला जातो- “सफरचंद कितीला?” क्षणभर दुकानदार थांबतो आणि मग शांतपणे उत्तर देतो… ५०० पाकिस्तानी रुपये किलो!

इतक्या उच्च दरांमुळेच सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. गोड, लालचुटूक सफरचंद पाहताना मन मोहित होते; पण त्यांची किंमत ऐकून मात्र ग्राहकांचे पाय मागे वळतील, असे दृश्य या व्हिडीओतून समोर येते. फळांचा सुगंध गोड असला तरी महागाईमुळे ती फळे खाण्याची इच्छा मारली जात असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

येथे पाहा व्हिडीओ