सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ केवळ मनोरंजनासाठी असतात, काही भावना व्यक्त करतात, तर काही व्हिडीओ समाज आणि व्यवस्थेसमोर गंभीर प्रश्न उपस्थित करतात. असेच काही व्हिडीओ पाहताना केवळ आश्चर्यच नाही तर चिंतादेखील वाटू लागते. अलीकडच्या काळात व्हायरल होणाऱ्या अनेक व्हिडीओंमधून कायद्याचा धाक कमी होत चालल्याचं दृश दिसत आहे.

सार्वजनिक ठिकाणी नियम मोडून प्रसिद्धी मिळवण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. “व्हायरल” होण्यासाठी काहीही करण्याची मानसिकता वाढत असताना, त्याचे परिणाम किती धोकादायक ठरू शकतात याचा विचार फारच कमी जण करतात. असेच काहीसे दृश्य नुकतेच समोर आले असून, या घटनेमुळे वाहतूक नियम, सार्वजनिक सुरक्षितता आणि कायद्याचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.

रुरकी येथून व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये काही तरुणांनी सार्वजनिक रस्ताच जणू स्टंटसाठी वापरल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सालीयर बायपास ते अब्दुल कलाम चौकदरम्यानचा असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओत अनेक गाड्या एकाच वेळी भरधाव वेगाने जाताना दिसतात. काही तरुण गाडीच्या खिडक्यांतून बाहेर लटकून मोबाईलने व्हिडीओ काढत आहेत, तर काही जण मोठ्याने हॉर्न वाजवून इतर वाहनांची वाट अडवत आहेत; त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या इतर लोकांना अपघात होऊ नये म्हणून बाजूला थांबावं लागलं.

काही दृश्यांमध्ये तरुणांच्या हातात हॉकी स्टिकही दिसत आहेत, त्यामुळे हा प्रकार फक्त वाहतूक नियम तोडण्यापुरता मर्यादित न राहता, कायदा आणि सुरक्षिततेसाठीही धोकादायक वाटत आहे. रोज अनेक लोक अपघातांमध्ये आपला जीव गमावत असताना, अशा निष्काळजी वर्तनामुळे निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो, याची या तरुणांना जाणीव नसल्याचं स्पष्ट दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. “रस्ते स्टंटसाठी नाहीत”, “हे मनोरंजन नाही, गुन्हा आहे”, अशा शब्दांत अनेक युजर्सनी आपला संताप व्यक्त केला आहे. काहींनी पोलिस प्रशासनाला टॅग करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे, तर काहींनी वाहन जप्त करणे आणि कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

अनेकांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की, हा प्रकारही इतर व्हायरल व्हिडीओंसारखाच काही दिवस चर्चेत राहून विसरला जाणार का, की यावर खरोखरच कारवाई होणार? एकाने तर मजेत आता कळलं: महामार्ग फक्त श्रीमंतांच्या मस्तीकरिताच आहेत का?” असा प्रश्नही विचारला. समाजात कायद्याचा धाक कायम राहण्यासाठी अशा घटनांवर कठोर पावलं उचलणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे.