Ganpati Decoration Inspired by Tukaram Mundhe : सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पा घरोघरी आणि सार्वजनिक मंडपांमध्ये विराजमान झाले आहेत. बाप्पाच्या आगमनापूर्वी घराघरांत आणि मंडळांमध्ये डेकोरेशनची लगबग सुरू होती. यंदा कोणी डेकोरेशनच्या माध्यमातून मुंबई लोकलचा प्रवास दाखवला, तर कोणी जुन्या मराठी शाळेचा देखावा उभा केला. काहींनी तर कोकणातील संस्कृती आणि परंपरांची झलकही आपल्या डेकोरेशनमधून साकारली. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ यापेक्षा हटके आहे. एका व्यक्तीच्या कामाने प्रेरित होऊन चक्क त्यांच्यावर आधारित खास डेकोरेशन साकारण्यात आले आहे.
@kavi_shabdanchya_duniyet हा इन्स्टाग्राम युजर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कामाने प्रेरित झाला आणि त्यांचं काम चक्क डेकोरेशनच्या माध्यमातून साकारण्याचं ठरवलं. त्याने सुरवातीला बाप्पाच्या मूर्तीच्या मदतीने माप ओलांडून घरात प्रवेश केला आहे. त्यानंतर बाप्पाचे मुखदर्शन दाखवत कॅमेरा डेकोरेशनकडे वळवला आणि समोर चक्क आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांचा पुठ्ठ्यापासून तयार केलेला पुतळा दिसला. त्यांच्या समोर तुकाराम मुंढे यांच्या कारवाईपूर्वी पदार्थ कशा पद्धतीने विकले जायचे आणि कारवाईनंतर त्यात काय बदल झाला, याची झलक डेकोरेशनच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे.
डेकोरेशनमध्ये तुकाराम मुंढे यांनी केलेल्या कारवायांचीही माहिती सुद्धा डेकोरेशन मार्फत देण्यात आली आहे. त्यांनी कोणत्या ठिकाणी आणि किती दिवसांत छापे टाकले, तसेच कोणत्या हॉटेल्स, दुकानांवर आणि कंपन्यांवर कारवाई केली, याचे छोटे-छोटे कटआउट्स आणि वर्तमानपत्रांतील कात्रणे डेकोरेशनचा भाग म्हणून लावण्यात आली आहेत. एकदा बघाच हे भन्नाट डेकोरेशन.
‘सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @kavi_shabdanchya_duniyet या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून ‘लोकांच्या मनात आणि देव्हारात स्थान मिळवणं ही कुठल्या फुकटच्या प्रसिद्धीची गोष्ट नाही, त्यासाठी निस्वार्थी कर्माची तपश्चर्या लागते जी प्रत्येकाच्या नशिबात नसते. मुंडेसाहेबांसारखे अधिकारी म्हणजे त्या तपश्चर्येचं जिवंत उदाहरण आहेत’, ‘मस्तच… खूप नवीन आणि अनोखी आयडिया आहे’, ‘मोदकमध्ये hygiene ठेवा’, ‘खुपचं छान दादा.. मस्त कॉमेंट्स आणि पदार्थ मस्त सजावट.. आदरणीय तुकाराम मुंढे साहेबांचे कटाऊट मस्त लायटिंग केले आहे.. अप्रतिम’, ‘मुंडे साहेबांना आत्ताच पाठवतो मोदक चेक करायला’, ‘“कल्पनेला दिलं रूप, मेहनतीने सजला हा सुंदर सोहळा,तुकाराम मुंढे साहेबांची थीम साकारून भावाने जिंकला मनाचा कोपरा’, आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.
