Lokmanya Tilak Holding Lord Ganesha Viral Video : लोकमान्य टीळक म्हटलं की, एक गोष्ट आवर्जून आठवते ती म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव. यंदा १४ सप्टेंबरला देशात गणेशोत्सव साजरा होईल. हा गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्रासाठी एक सोहळाच असतो. तर हा सोहळा साजरा करण्यासाठी घरोघरी व सार्वजनिक मंडपात गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली जाते. त्यासाठी अगदी आपण एक ते दोन महिना आधीच मूर्ती बुक करून ठेवतो. कोणी उंदरावर बसलेली तर कोणी जास्वंदाच्या फुलात ऐटीत बसलेली मूर्ती आणतो. पण, सध्या एका अनोख्या मूर्तीची चर्चा होताना दिसते आहे.

व्हायरल होत असलेला हा गणपती बाप्पा कोल्हापूरच्या शाहूपुरी, तिसरी गल्ली येथील शिवतेज मित्र मंडळाचा असल्याचे सांगितले जात आहे. या मंडळाचे आधारस्तंभ माननीय श्री. नितीन दादा चिपळूणकर आहेत. या मूर्तीचे खास वैशिष्ट्य म्हणजे मूर्तिकाराने लोकमान्य टिळक पाटावर गणपती बाप्पाला बसवून घेऊन येत असल्याचे दृश्य साकारले आहे. एकेकाळी लोकमान्य बाळगंगाधर टीळक यांच्यामुळे घरगुती गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप आले. त्यामुळे या अनोख्या संकल्पनेमुळे गणपती बाप्पाची ही मूर्ती सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या रिल्समध्ये आपण गणपतीच्या अनेक अनोख्या मूर्ती पाहत आहोत. कुठे बॅलन्स मूर्ती, तर कुठे स्पर्धा करण्यासाठी उंचच उंच मूर्ती, काही ठिकाणी विचित्र रूपातील गणपती, तर काही जण ९०च्या दशकातील साध्या-सोप्या गणपतीच्या मूर्ती साकारताना दिसत आहेत. अशाच या ट्रेंडच्या दुनियेत एका मूर्तिकाराने मात्र अनोखी संकल्पना साकारली आहे. ज्यांच्या संकल्पनेतून गणेशोत्सवाची सुरुवात झाली, त्यांच्याच हातात बाप्पा विराजमान झाल्याचे या मूर्तीतून दाखवण्यात आले आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @kolhapur_shootout2111 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘लोकमान्य टिळक’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच नेटकरी व्हिडीओ पाहून ‘खूप सुंदर कल्पना! गणपती बाप्पा मोरया’, ‘मस्त कल्पना’, ‘किती सुंदर’, ‘खूप छान’, ‘कोल्हापूरचा देखणा गणपती’, ‘यालाच म्हणतात खरा गणेशोत्सव! गणपतीचा खरा अवतार/रूप इथे पाहायला मिळतं; नाहीतर आजकाल लोकांनी गणेशोत्सवाचा फक्त खेळ मांडला आहे’, ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.