General Coach Girl singing Song: आजच्या सोशल मीडियाच्या काळात आपली कला दाखवण्यासाठी मोठ्या स्टेजची किंवा खास व्यासपीठाची गरज उरलेली नाही. फक्त कार्यक्रमात किंवा स्पॉटलाईटखालीच नाही, तर रोजच्या आयुष्यातील साध्या क्षणांतूनही खरी प्रतिभा समोर येते. गाणं, नृत्य, अभिनय अशा अनेक कला आता मोबाईल कॅमेऱ्यामुळे थेट लाखो लोकांपर्यंत पोहोचतात.

कधी एखादा अचानक घडलेला क्षण, तर कधी अगदी साध्या ठिकाणी दिसणारी कला लोकांना थक्क करून जाते. असाच एक सुंदर आणि भावूक क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तो पाहणाऱ्यांच्या मनाला स्पर्श करत आहे. हा व्हिडीओ पाहताना अनेकांना आनंद, आश्चर्य आणि भावनांचा खास अनुभव मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणी ट्रेनच्या जनरल बोगीत बसून गाणं गाताना दिसते. ती वरच्या सीटवर आपल्या मैत्रिणीसोबत आरामात बसलेली आहे. तिच्या हातात माईक आहे; पण कोणतंही म्युझिक सिस्टीम किंवा पार्श्वसंगीत नाही. तरीही तिचा आवाज इतका सुंदर आणि प्रभावी आहे की, काही क्षणांतच संपूर्ण बोगी तिच्या गाण्यात रमून जाते. ट्रेन चालू असताना रुळांचा आवाज आणि आजूबाजूची गर्दी असूनही तिचा स्वर सगळ्यांना स्पष्ट ऐकू येतो. तिनं लता मंगेशकर यांचं प्रसिद्ध गाणं ‘लग जा गले’ गायलं आणि ते ऐकून प्रवासी भारावून गेले.

सुरुवातीला लोक थोडे आश्चर्यानं पाहतात, पण नंतर सगळे शांतपणे तिचं गाणं ऐकू लागतात. काही लोक हसत तिचं कौतुक करतात, तर काही जण हा सुंदर क्षण मोबाईलमध्ये रेकॉर्ड करतात. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ranjinisings या अकाउंटवरून शेअर केला गेला असून, आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे.

पाहा व्हिडीओ

या व्हिडीओवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेक युजर्सनी तिच्या आवाजाचं आणि धाडसाचं मनापासून कौतुक केलं आहे. “तुझ्या आवाजात जादू आहे”, “अशा कलेला सलाम”, “हा क्षण प्रत्यक्ष पाहायला मिळाला नाही याची खंत आहे” अशा भावनिक प्रतिक्रिया लोकांनी केल्या आहेत. काही जणांनी अभिमान व्यक्त करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मात्र, काही युजर्सनी सार्वजनिक ठिकाणी गाणं गाण्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. “सगळ्यांनाच हे संगीत आवडेलच असं नाही”, “पब्लिक प्लेसवर गाण्यापूर्वी लोकांची परवानगी असावी” अशाही प्रतिक्रिया दिसून आल्या. तरीही बहुसंख्य लोकांनी हा व्हिडीओ सकारात्मकतेने पाहिला, तिच्या आवाजानं ट्रेनचा प्रवास खास बनवल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.