Viral Video: गोव्यातील एका भावनिक भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका महिलेची गोव्यात एका अनोळखी व्यक्तीशी भेट झाली. संवादादरम्यान त्या व्यक्तीने आपली व्यथा सांगितली आणि त्यानंतर महिलेने त्याला मदतीचा हात देण्याचे आश्वासन दिले. या घटनेने अनेकांचे मन जिंकले आहे.
व्हिडिओ शेअर करणाऱ्या महिलेने, “प्रत्येक प्रवास हा फक्त फिरण्यासाठी नसतो. कधी कधी आयुष्यात योग्य वेळी योग्य माणसे भेटतात,” अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.
व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये महिला त्या व्यक्तीशी संवाद साधताना दिसते. या व्हिडीओत तो माणूस मूळचा महाराष्ट्रातील असल्याचे सांगतो. व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने तो गोव्यात आला होता. मात्र, व्यवसायात मोठे नुकसान झाल्याने त्याच्यावर कठीण परिस्थिती ओढवली. त्याने आपली आर्थिक अडचण आणि संघर्ष महिलेसमोर मोकळेपणाने मांडला.
त्याची परिस्थिती ऐकल्यानंतर महिलेने त्याला धीर दिला. “आमच्याकडून जेवढी शक्य असेल तेवढी मदत नक्की करू,” असे तिने सांगितले. गरज पडल्यास इतरांचीही मदत मिळवण्याचा प्रयत्न करू, असेही तिने त्याला आश्वासन दिले.
संवादादरम्यान तो माणूस खूप भावूक झाल्याचे दिसते. आयुष्यात प्रत्येकावर कठीण काळ येतो, असे सांगत त्याने महिलेचे आभार मानले. त्याचवेळी तिने त्याला खाण्यासाठीही काही देऊ केले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @nischitha_naren या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल 97.6k व्ह्यूज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी महिलेच्या संवेदनशीलतेचे आणि माणुसकीचे कौतुक केले. काहींनी त्या व्यक्तीला प्रत्यक्ष मदत करण्याचीही इच्छा व्यक्त केली.
एका युजरने कमेंट करत लिहिलं, “देव तुझं भलं करो, निश्चिता. हे चांगलं काम असंच चालू ठेव, त्यामुळे लोकांना चांगली कामे करण्याची आणि हे जग अधिक चांगले बनवण्याची प्रेरणा मिळते.” तर दुसऱ्याने “कृपया त्याला नोकरी मिळवून द्या, त्याला आता थोडी मदत मिळाली आहे, मी आभारी आहे, पण पैसे मिळवण्यासाठी तो रोज कोणाची तरी वाट पाहू शकत नाही.” अशी कमेंट केली.
एका नेटकऱ्याने तो सुरक्षितपणे महाराष्ट्रात आपल्या कुटुंबाकडे परत जावा, अशी मदत करण्याची तयारी दर्शवली. तर काहींनी त्याच्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याची इच्छा व्यक्त केली.
