आजच्या काळात यश सहज मिळत नाही; त्यासाठी सततची मेहनत, अपार कष्ट आणि अनेक तडजोडी कराव्या लागतात. प्रत्येक यशामागे न दिसणारा संघर्ष असतो आणि त्या संघर्षाचे फळ जेव्हा आपल्या माणसांच्या चेहऱ्यावर आनंद बनून उमटते, तेव्हा तो क्षण आयुष्यभर लक्षात राहणारा ठरतो. अशाच प्रकारचे व्हिडीओ लोकांच्या आठवणीत कायम राहतात, कारण त्यामध्ये भावना, नाती आणि आयुष्याचा खरा अर्थ दडलेला असतो. आजच्या धावपळीच्या स्पर्धात्मक जीवनात माणूस यश, पैसा आणि स्थैर्य यामागे धावत असतो. मात्र, या सगळ्यापलीकडे काही क्षण असे असतात, जे कोणत्याही मोजमापात बसत नाहीत. अशाच एका भावनिक क्षणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून, तो पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांत नकळत पाणी आणत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ चेन्नईतील एका तरुणाच्या आयुष्यातील खास क्षण दाखवतो. किरुबाकरन राजेंद्रन नावाच्या या तरुणाने स्वतःच्या कष्टाच्या कमाईतून आपले पहिले घर खरेदी केले. त्यानंतर तो आपल्या आई-वडिलांना पहिल्यांदाच त्या घरात घेऊन जातो. व्हिडीओमध्ये दिसते की, घरात पाऊल टाकताच त्याच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, आनंद आणि अभिमानाची झलक असते.
घराची लिव्हिंग रूम, सजावट आणि भिंती पाहताना ते भारावून जातात. ते भिंतींना हात लावताना जणू आपल्या मुलाच्या संघर्षाची, मेहनतीची आणि त्याने पाहिलेल्या स्वप्नांची जाणीव करत असल्यासारखे वाटते. या व्हिडीओसोबत किरुबाकरनने लिहिले आहे की, “माझ्या आई-वडिलांनी पहिल्यांदा स्वतःचे घर पाहिले तो क्षण अमूल्य होता. कोणतीही प्रॉपर्टी किंवा म्युच्युअल फंडची एक्सेल शीट याची तुलना करू शकत नाही.”
पाहा व्हिडीओ
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @kirubaakaran या हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अवघ्या ५४ सेकंदांच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर भावनांचा पूर आणला आहे. हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी हा क्षण पाहून स्वतःच्या आई-वडिलांची आठवण आल्याचे सांगितले.
एका युजरने प्रतिक्रिया देत लिहिले, “हा व्हिडीओ पाहून संपूर्ण दिवस आनंदात गेला.” तर दुसऱ्याने म्हटले, “दुनियेतली सगळी संपत्ती एका बाजूला आणि आई-वडिलांचे समाधान एका बाजूला.” काही लोकांनी या तरुणाच्या कर्तृत्वाचे कौतुक करताना, प्रत्येक मुलाने आपल्या पालकांसाठी असे क्षण निर्माण करावेत, असे मत व्यक्त केले. हा व्हिडीओ केवळ एक घर खरेदी करण्याची गोष्ट नसून ते कुटुंब, प्रेम, त्याग आणि पालकांच्या स्वप्नांची पूर्तता यांचे सुंदर प्रतीक ठरत आहे.

