Viral Video House Owner Give Special Gift To House Help : उन्हाळा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हात घराबाहेर निघणेही नकोसे वाटते. त्यामुळे अनेक जण या काळात घरात एसी, कूलर सेकेंड हँड का होईना घेण्याच्या विचारात असतात. रात्री थकून आल्यावर थंडगार एसी, कूलर लावून मस्तपैकी झोपून जातात. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये एका कुटुंबाने फक्त स्वतःसाठी नाही तर स्वतःच्या घराप्रमाणे घर सांभाळणाऱ्या एका खास व्यक्तीसाठी एअर कूलर मागवला आहे.
घरकाम करणारी मोलकरीण स्वयंपाकघरात ओटा साफ करत असते. तेवढ्यात तिची मालकीण तिला हाक मारते आणि म्हणते, “ताई, तुझ्यासाठी काहीतरी आहे.” ती उत्सुकतेने मालकिणीच्या मागे दुसऱ्या खोलीत जाते, जिथे एक मोठं गिफ्ट ठेवलेलं असतं. ती लगेच विचारते, “हे काय आहे?”. जेव्हा तिला कळतं की, गिफ्ट एअर कूलर आहे. तेव्हा ती आनंदाने ओरडते आणि मालकीणीला दोनदा मिठी सुद्धा मारते.
मोलकरणीचीही आम्ही काळजी घेतो (Viral Video)
मोलकरीण एक दिवस जरी आली नाही, तर घरातील महिला आणि एकूणच कुटुंबांचे हाल होतात. स्वतःच्या घरातील कामं आवरून दुसऱ्यांच्या घरी जाऊन भांडी घासणे, लादी पुसणे, कपडे धुणे, घर स्वच्छ ठेवणे ते घरातील लहान बाळांना सांभाळणे वाटतं तितकं सोपं नसते. त्यामुळे पगाराव्यतिरिक्त त्यांची काळजी घेणे, मान-सन्मान देणे, घरात त्यांना सुरक्षित वाटू देणे आपलंच कर्तव्य असते. तर आज या कुटुंबाने देखील उन्हाळ्यात दिवसरात्र घरचं काम करणाऱ्या मोलकरीण ताईला एअर कूलर गिफ्ट म्हणून दिला आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @lifeofcocoandchico या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “आमचं घर सांभाळणाऱ्या आणि आमच्यावर व आमच्या कुत्र्यांवर स्वतःच्या मुलांसारखं प्रेम करणाऱ्या मोलकरणीचीही आम्ही काळजी घेतो” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच कुटुंब आणि घरकाम करणाऱ्या महिलेच्या प्रामाणिक प्रतिक्रियेची प्रशंसा करणाऱ्या शेकडो कमेंट्सही आल्या आहेत. त्यात “ती ज्या प्रकारे मिठी मारते, त्यावरून कळतं की तिच्यासाठी किती सुरक्षित आणि आपुलकीचं वातावरण तयार केलं आहे”, “तिचा आनंद पाहून मी सुद्धा भावूक झाले” आदी अनेकविध कमेंट्सचा समावेश आहे.
