Indian Family Flight Video: विमानात प्रवास करताना प्रवासी सहसा आपापल्या जागेवर शांतपणे बसलेले दिसतात. मात्र, सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओने या नेहमीच्या चित्राला छेद दिला आहे. एका मोठ्या भारतीय कुटुंबाने चक्क विमानातच घरगुती जेवणाचा मोठा बेत मांडला. ढोकळा, थेपले आणि इतर खाद्यपदार्थ काढून कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना जेवण वाढायला सुरुवात केली. काही क्षण तर हे दृश्य विमानातील प्रवासापेक्षा भारतीय रेल्वेतील कुटुंबाच्या प्रवासाची आठवण करून देणारे वाटते; पण याच व्हिडीओवरून आता समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

विमानात नेमकं काय घडलं?

समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक मोठे भारतीय कुटुंब इंडिगोच्या विमानातून प्रवास करताना दिसत आहे. प्रवासासाठी या कुटुंबाने घरूनच भरपूर खाद्यपदार्थ आणल्याचे दिसते. त्यात ढोकळा, थेपले आणि विविध खाण्याच्या पदार्थांचा समावेश आहे.

विमानातील आसनांवर बसल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी हे पदार्थ बाहेर काढले आणि सगळ्यांसाठी जेवणाची ताटे तयार करण्यास सुरुवात केली. एक महिला खाद्यपदार्थांची ताटे इतर प्रवाशांपर्यंत पोहोचवताना दिसते. विशेष म्हणजे, वापरलेली ताटे आणि चमचे टाकण्यासाठी या कुटुंबाने एक मोठी पिशवीही सोबत आणली होती.

व्हिडीओवर Desi families while travelling core असा मजकूरही लिहिलेला आहे.

विमानातच तयार झाला जणू घरचा जेवणाचा डबा!

व्हिडीओतील दृश्य पाहिल्यानंतर अनेकांना हा प्रवास विमानाचा आहे की रेल्वेचा, असा प्रश्न पडू शकतो. कारण- कुटुंबातील अनेक सदस्य एकत्र बसलेले, खाद्यपदार्थ एकमेकांना देताना आणि काही जण आसनांमधून फिरताना दिसत आहेत. घरातील एखाद्या समारंभात किंवा लांबच्या रेल्वे प्रवासात कुटुंबीय एकत्र जेवण करताना दिसतात, अगदी तसेच वातावरण या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.

मात्र, याच गोष्टीने काही समाजमाध्यम वापरकर्त्यांचे लक्ष वेधले आणि त्यानंतर व्हिडीओवरून वेगळाच वाद सुरू झाला.

‘सिविक सेन्स’वरून नेटकऱ्यांमध्ये वाद

हा व्हिडीओ प्रसारित करणाऱ्या एका वापरकर्त्याने भारतीयांच्या सार्वजनिक ठिकाणी वागण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केला. त्याने दावा केला की, एका कुटुंबाने सुरू असलेल्या विमानात जणू भोजनालयच सुरू केले. सुमारे १५ जण एकत्र बसले, घरचे खाद्यपदार्थ काढले आणि ताटे घेऊन विमानाच्या आसनांमध्ये फिरू लागले, अशी टीका त्याने केली.

त्याच्या मते, प्रश्न केवळ विमानात अन्न खाण्याचा नाही, तर खाद्यपदार्थांचा वास संपूर्ण प्रवासात जाणवू शकतो आणि काही प्रवाशांना तो आवडणार नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी इतर प्रवाशांचा विचार करणे गरजेचे असल्याचे त्याने म्हटले.

या पोस्टनंतर काही नेटकऱ्यांनी कुटुंबावर कठोर टीका केली. एका वापरकर्त्याने संबंधित कुटुंबाला काही काळ विमान प्रवासावर बंदी घालण्याची मागणी केली. तर दुसऱ्याने उपरोधिक प्रतिक्रिया देताना, विमानातील मोकळ्या मार्गावर त्यांनी गरबा खेळायला हवा होता, अशी टिप्पणी केली.

पण काहींनी कुटुंबाची बाजूही घेतली!

या संपूर्ण वादात प्रत्येक जण कुटुंबाच्या विरोधातच होता, असे नाही. काही समाजमाध्यम वापरकर्त्यांनी या कुटुंबाची बाजू घेतली. विमानात स्वतःचे खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी असल्याने त्यांनी कोणताही नियम मोडलेला नाही, असा युक्तिवाद काहींनी केला.

विमान कंपन्यांकडून प्रवाशांना अन्न दिले जाते, मग घरचे खाद्यपदार्थ खाल्ल्यानेच त्याच्या वासाचा प्रश्न का उपस्थित केला जात आहे, असा सवालही काहींनी केला. एका वापरकर्त्याने तर आपल्या घरचे अन्न, कुटुंब आणि आपुलकीचा आनंद दुसरे कुटुंब घेताना पाहून अनेकांना त्यांच्या घराची आठवण येऊ शकते, असे म्हटले.

त्यामुळे आता या व्हिडीओवरून एकच प्रश्न चर्चेत आला आहे की, विमानात कुटुंबासोबत घरचे अन्न वाटून खाणे ही आपुलकी आहे की सार्वजनिक ठिकाणी शिस्तीचा अभाव? तुमचे मत काय?

येथे पाहा व्हिडीओ