Mother And Son Skydive Viral Video : उंच हवेत लोकांना स्कायडायव्हिंग करण्याची आणि इतरांना हा स्टंट करताना पाहण्याची अनेकांना उत्सुकता असते. त्यातील काही लोक स्कायडायव्हिंग करताना हवेत वेगवेगळे स्टंटसुद्धा करून दाखवतात. पण, ज्याला उंचावर जाण्याची भीती वाटत नाही अशीच मंडळी हा स्टंट पूर्ण करतात ,असाच आपला समज असतो. तर हा समज आज ८० वर्षीय आजीने खोडून काढला आहे. आज सोशल मीडियावर टँडम स्कायडायव्हिंगचा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे.
८० वर्षीय डॉक्टर श्रद्धा चौहान यांनी टँडम स्कायडायव्हिंग पूर्ण करणाऱ्या सर्वांत वयस्कर भारतीय महिला म्हणून इतिहासात आपले नाव कोरले आहे. निवृत्त ब्रिगेडियर सौरभ सिंह शेखावत (Brigadier Saurabh Singh Shekhawat) यांच्या आई डॉक्टर श्रद्धा चौहान (Dr. Shraddha Chauhan) यांनी चक्कर येणे, मानेचे सांधेदुखी (सर्व्हायकल स्पाँडिलायटिस) व मणक्याच्या डिस्क सरकण्याची समस्या असूनही १० हजार फूट उंचीवरून उडी मारून आपला ८० वा वाढदिवस साजरा केला हे एका आश्चर्यापेक्षा कमी नाही.
वय फक्त आकडा…(Viral Video)
दिल्लीपासून फक्त दोन तासांच्या अंतरावर आणि भारतातील एकमेव प्रमाणित नागरी ड्रॉप झोन म्हणजे हरियाणामधील नारनौल एअरस्ट्रिप येथे असणारे स्कायहाय इंडिया. येथे ८० वर्षीय महिलेने तिची ही कामगिरी करून दाखवली आहे. तसेच ही कामगिरी करण्यात श्रद्धा चौहान यांच्याबरोबर त्यांचा लेकदेखील होता; जो भारतातील सर्वांत सन्मानित लष्करी अधिकाऱ्यांपैकी एक आहे. ब्रिगेडियर सौरभ सिंह शेखावत, केसी, एससी, एसएम, व्हीएसएम (निवृत्त), सन्मानित सैनिक, गिर्यारोहक, घोडेस्वार, स्कायडायव्हर आणि स्कायहाय इंडिया येथे मुख्य प्रशिक्षकसुद्धा आहेत.
व्हिडीओ नक्की बघा…
तर व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, सौरभ यांनी आईला ट्रेनिंग देऊन, तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दोघेही सुरक्षित उपकरणे परिधान करून विमानात बसले. त्यानंतर विमानातून १० हजार फूट उंचीवरून उडी मारून दोघांनीही टँडम स्कायडायव्हिंग करण्याचा अनुभव घेतला आहे; जो बघायला खूपच सुंदर वाटतो आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @skyhighindia ने त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून शेअर केला आहे आणि महिलेच व तिच्या लेकाचे कॅप्शनमध्ये भरभरून कौतुक केले आहे.