Leopard Catches Puppy In Palghar : जंगली प्राण्यांच्या हल्ल्यातून जीव वाचवणं म्हणजे नशिबाचीच साथ मिळणं अशा प्रसंगातून सुखरूप बाहेर पडणं एखादी लॉटरी लागल्यासारखंच वाटणं साहजिकच आहे. महाराष्ट्रातील पालघरमध्ये अशीच एक घटना घडली. बिबट्या व भटक्या श्वानांमध्ये मध्यरात्री घडलेली गोष्ट चर्चेचा विषय ठरली आहे. या नाट्यमय प्रसंगाबद्दल स्थानिक मंदिराजवळ बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे माहिती मिळाली.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी ही घटना महाराष्ट्रातील पालघरमध्ये एका निवासी भागात घडली. रात्रीच्या वेळी श्वान आणि त्याच्या दोन पिल्लांच्या मागून बिबट्या धावताना दिसला. बिबट्याला पाहताच मोठे श्वान त्वरित सुरक्षित ठिकाणी पळून गेले. मात्र, दोन लहान पिल्ले मागेच राहिली. त्यानंतर बिबट्याने त्या लहान पिल्लाचा पाठलाग केला आणि एका पिल्लाला पकडण्यात त्याला यश आले. पण, कुणास ठाऊक काही क्षण थांबून, सीसीटीव्ही कॅमेराकडे बघत बिबट्याने अचानक पिल्लाला सोडून दिले. हल्ला करण्याऐवजी त्याने जीवनदान दिले. त्यामुळे बिबट्याकडून सुरक्षितपणे सुटका होताच पिल्लू तिथून पळून गेले. नंतर बिबट्याही त्याच्या मागे जाताना व्हिडीओत दिसते आहे.

सीसीटीव्ही फुटेजमुळे चर्चा

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. अनेक प्रेक्षकांनी बिबट्याच्या या कृतीचे वर्णन ‘दयाळू’ असे केले आहे किंवा त्या प्राण्याने पिल्लाप्रती ‘संवेदना’ दर्शवली असावी, असे मत व्यक्त केले आहे. पण, एका छोट्या सीसीटीव्ही रेकॉर्डिंगच्या आधारे वन्य प्राण्यामध्ये मानवी भावना किंवा हेतू असल्याचे मानण्याबाबत तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे.बिबट्या हा मांसाहारी शिकारी प्राणी आहे. पण, भूक, संधी, परिसर आणि विशिष्ट परिस्थितीला दिलेला प्रतिसाद यांसारख्या घटकांवरून त्याचे वर्तन बदलू शकते. एखाद्या प्राण्याला पकडणे म्हणजे शिकारी प्राणी त्याला मारून टाकेलच असे नाही.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @khojepatrakaar या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून ‘ही दया किंवा करुणा नाही. शिकारी प्राणी मजेसाठी शिकार करत नाहीत; ते अन्नासाठी शिकार करतात. एखादं पिल्लू त्यांच्या पोटाची भूक भागवण्यासाठी खूपच कमी असतं. त्यामुळे ते अशा छोट्या प्राण्याच्या मागे वेळ वाया घालवण्याऐवजी मोठ्या शिकारीच्या शोधात जातात’, ‘मला वाटतं, कॅमेऱ्यासमोर आपली शिकार करायला त्याला थोडी लाज वाटत असावी!’ ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.