baby naming ceremony viral video : आयपीएल २०२६ चा मोसम सुरू झाला असून प्रत्येक जण स्वतःच्या टीमला सपोर्ट करताना दिसत आहेत. फक्त सोशल मीडियावरच नाही ज्या दिवशी आवडत्या टीमचा सामना असतो त्यादिवशी कामावरून लवकर येऊन, जर्सी घालून, टीव्हीसमोर बसून मॅच जिंकण्यासाठी प्रार्थना करताना दिसतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, यामध्ये लेकराच्या बारशासाठी सुद्धा चक्क आयपीएलच्या प्रसिद्ध टीमच्या जर्सीचा वापर करण्यात आला आहे.
अनेकदा बारशाला बदाम, पाने, फुले किंवा कार्टूनच्या आकारात लहान मुलांनी नावे लिहिली जातात. मग त्यावर लावलेला कागद काढून नाव सगळ्यांना सांगितले जाते. पण, महाराष्ट्रातील एका जोडप्याने मुलाच्या नामकरण सोहळ्याला आयपीएलमधील टीमच्या जर्सीचा अनोखा वापर केला. ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ (RCB) टीमच्या जर्सीचा वापर करून आपल्या बाळाचं नाव विराट असे सांगितले आहे. क्रिकेटवरील निस्सीम प्रेम आणि कौटुंबिक परंपरा यांचा अत्यंत हृदयस्पर्शी संगम पाहायला मिळाला.
“टीमसाठी प्रामाणिक असावं तर इतकं” (Viral Video)
या नामकरण सोहळ्याचा व्हिडीओ गौरी महाडिक यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. नावाचा खुलासा करण्याच्या पारंपारिक पद्धतीऐवजी, या जोडप्याने हिंट देऊन नाव ओळखण्यासाठी आरसीबीच्या जर्सीचा वापर केला. वडिलांनी जर्सी उंचावून धरली होती तर आईने आपल्या बाळाला उचलून घेतले होते. बाबांनी जर्सी उघडून दाखवली तेव्हा त्यावर “Virat” हे नाव दिसलं. हे नाव फक्त नाव नव्हतं, तर भारतातील एक प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली बद्दलच्या आदराचं प्रतीक होतं. त्यामुळे या नावाने ओळख जिद्द, मेहनत, नेतृत्व आणि नेहमी जिंकण्याची इच्छा अशा गुणांची आठवण करून दिली.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @gaurimahadik1 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून “टीमसाठी प्रामाणिक असावं तर इतकं”, “मी आतापर्यंत पाहिलेलं सर्वात सुंदर आणि खास बारसं”, “मी सुद्धा माझ्या आरसीबी प्रेमी पार्टनर बरोबर असंच बारसं करणार”, “पण बाळाला वाटतं मुंबई इंडियन्स टिम आवडतेय वाटतं, कारण – ते रडतंय” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.
